मुंबई. Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असल्याचे दिसून आले आहे. या महामार्गावर पुन्हा मृत्यूचं ताडंव दिसून आलं आहे. भरधाव ट्रकच्या भीषण धडकेत 8 महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. दिवसभराचे काम आटपून घरी परतणाऱ्या या मजुरांवर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत जाहीर केली आहे.

समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यात कडवंची शिवारात बुधवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 8 महिला मजूरांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरवरून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने काम करून घरी परतत असलेल्या मजूर महिलांना उडवलं. अपघातानंतर मृतदेह जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. आता राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांसाठी पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्याच आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवसभराचे काम आटपून हे सर्व मजूर आपल्या गावाकडे निघाले होते. त्याच वेळी नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, 6 महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जणींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे मृतांचा एकूण आकडा 8 वर पोहोचला आहे.

मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीची घोषणा-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबाबत माहिती देताना ट्विट करत म्हटले की, जालनानजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ जालना प्रशासन आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून जखमींना त्वरित उपचार देण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या अपघाताबाबत म्हटले की, जालना परिसरात समृद्धी महामार्गावर घडलेली भीषण अपघाताची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत आपले प्राण गमावलेल्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते.

    बदनापूर तालुक्यातील कुटुंबांवर शोककळा-

    या अपघातात मृत्यू झालेले सर्व मजूर जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये अलकाबाई दादाराव आदमाने (45), लक्ष्मीबाई संतोष मदन (35), मीना परमेश्वर आदमाने (45), कांचनबाई प्रकाश आदमाने (50), ताराबाई गहिनाजी चौधरी (60), कडूबाई रामदास मदन (55) आणि सुमनबाई कचरू आदमाने (70) आणि मंगलबाई शिनगारे यांचा समावेश आहे.