जेएनएन, छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर शहरातील गांधीनगर परिसरात राजकीय तणावाला हिंसक वळण लागल्याची घटना समोर आली आहे. भाजपचे पराभूत उमेदवार बंटी चावरिया यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांसह जोरदार दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून काही काळ तणाव निर्माण झाला होता.

घरावर तुफान दगडफेक

प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास काही जणांचा जमाव अचानक बंटी चावरिया यांच्या निवासस्थानी दाखल झाला. सुरुवातीला जोरजोरात घोषणाबाजी केल्यानंतर काही क्षणातच लाठ्या-काठ्या आणि दगडांच्या सहाय्याने घरावर तुफान दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात घराच्या काचा फोडल्या गेल्या असून दुचाकी आणि इतर मालमत्तेचेही नुकसान झाल्याचे समजते. 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाला पांगवून परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी खबरदारी म्हणून गांधीनगर परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  

हल्लेखोरांविरोधात कडक कारवाईची मागणी

या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंटी चावरिया यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, हल्लेखोरांविरोधात कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 

    दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

    या घटनेमुळे संभाजीनगरच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून सर्व पक्षांकडून हिंसाचाराचा निषेध व्यक्त केला जात आहे.