जेएनएन, धाराशिव: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे अखेर नागरिकांचा संताप अनावर झाल्याचं चित्र समोर आलं आहे. सिलेंडर मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी थेट गॅस एजन्सीच्या कार्यालयात घुसून जोरदार गोंधळ घातला. यावेळी एजन्सी चालक आणि ग्राहकांमध्ये तीव्र बाचाबाची झाल्याची माहिती मिळते.
घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याने गोंधळ
स्थानिकांच्या माहितीनुसार, मागील तीन ते चार दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. अनेकांनी वेळेवर बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आज संतप्त नागरिकांनी एजन्सीवर धडक देत जाब विचारला
आम्ही पैसे फेकून सिलेंडर घेऊन जाऊ
“सिलिंडर देत नसाल तर आम्ही पैसे फेकून सिलेंडर घेऊन जाऊ,” असा इशाराही काही नागरिकांनी यावेळी दिला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने काही काळ एजन्सी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, गॅस टंचाईमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, पुरवठा साखळीत अडथळा आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एजन्सी चालकांकडूनही पुरेसा साठा उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन करत लवकरच गॅस पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
गॅस टंचाईचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर पुढील काळात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
