जेएनएन, नांदेड. Nanded Gangwar: शहरात गँगवॉरची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन टोळ्यांतील जुन्या वादातून रक्तरंजित संघर्ष उफाळून आला आहे. नांदेड शहरात शनिवारी पहाटे दोन प्रतिस्पर्धी टोळ्यांच्या सदस्यांमध्ये झालेल्या संघर्षात तीन जणांची हत्या झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दोन जणांचा जागीच मृत्यू
शहरातील एका मॉलजवळ पहाटे दीडच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सदा टोळी आणि साई लाला टोळीच्या सदस्यांनी एकमेकांवर कट्यारी व धारदार शस्त्रांनी हल्ला केला, ज्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, असे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले.
रुग्णालयाच्या आवारातच हल्ला करून हत्या
गंभीर दुखापतींमुळे ज्या तिसऱ्या व्यक्तीला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्याच्यावर रुग्णालयाच्या आवारातच पुन्हा हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
मृत व्यक्तींची ओळख अर्जीत सिंग, सय्यद आवेज आणि मोहम्मद अरबाज अशी पटली आहे, असे त्यांनी नमूद केले.
नेमकं काय घडलं
माहितीनुसार, अरिजितसिंग चव्हाण हा आपल्या साथीदारांसह ‘धुरंधर’ सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. सिनेमा संपल्यानंतर तो बुलेटवरून बाहेर पडताच प्रतिस्पर्धी गँगने त्याच्यावर हल्ला चढवला. धारदार शस्त्रांनी व गोळीबार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
या हल्ल्यात जखमी झालेल्या आरोपींपैकी एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, अरिजितसिंगचा भाऊ आणि त्याचे साथीदार संतापाच्या भरात थेट रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर त्यांनी जखमी आरोपीवर हल्ला करत त्याचा जीव घेतला. त्यामुळे ही घटना आणखी गंभीर व धोकादायक बनली.
नांदेडमध्ये भीतीचं वातावरण
या दुहेरी हत्याकांडामुळे नांदेडमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी तातडीने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. शहरातील संवेदनशील भागात पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात ही घटना जुन्या वैमनस्यातून घडल्याचं समोर येत आहे. दोन्ही टोळ्यांमध्ये यापूर्वीही वाद झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
