जेएनएन, छत्रपती संभाजीनगर: शहरात मोबाईल आणि एका मुलीच्या वादातून कुख्यात गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये भीषण गँगवॉर उफाळून आला. या वादातून सराईत गुन्हेगारांनी थेट गोळीबार करत एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

एकमेकांच्या घरांवर दगडफेक

प्राथमिक माहितीनुसार, दोन गटांमध्ये सुरू असलेला जुना वाद अचानक हिंसक वळणावर गेला. आरोपींनी एकमेकांच्या घरांवर दगडफेक केली, रस्त्यावर दहशत माजवली आणि मध्ये पडणाऱ्या नागरिकांनाही जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शहर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत मोठी कारवाई करत शुभम जाटसह सात आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे, यातील एक आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी गच्चीवरील पाण्याच्या टाकीत लपून बसला होता. 

पोलिसांना सुरुवातीला आरोपीच्या आईने तो रेल्वे रुळाच्या दिशेने पळून गेल्याचे सांगितले. मात्र, तिच्या जबाबात संशय वाटल्याने पोलिसांनी घराची सखोल झडती घेतली. गच्चीवरील पाण्याच्या टाक्या तताना एका टाकीत शुभम नावाचा आरोपी लपलेला आढळून आला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर उर्वरित आरोपींचाही शोध घेऊन अटक करण्यात आली.

साहित्य जप्त 

    या गँगवॉरमध्ये वापरलेली शस्त्रे, दगडफेकीसाठी वापरलेले साहित्य आणि इतर पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत. सध्या सर्व आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. 

    दरम्यान, शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.