Dharashiv Fire News: रविवारी संपूर्ण देश दिवाळीच्या जल्लोषात रंगला असतानाच धाराशिवमधून एक दुदैवी घटना समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री अचानक घराने पेट घेतला. यादरम्यान घरात असलेल्या सहा जणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. गोविंद करंडे यांच्या घराला ही आग लागली यात सहा जणांचा मृत्यू झाला असून एका व्यक्तींवर उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
गोविंद करंडे यांचे दोन मजली घर असून तळघरात करंडे किराणा अँड जनरल स्टोअर असे दुकान असून या किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर करंडे कुटुंब राहत होते. मध्यरात्रीच्या सुमारास घराला अचानक आग लागली व यात ६ जणांचा दुदैवी अंत झाला. मध्यरात्रीपासून गावकरी आणि अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
रात्री 2.30 च्या सुमारास ही आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अजून समजू शकलेलं नाही. मात्र दिवाळीनिमित्त घरात पणत्या लावलेल्या होत्या. या पणत्यांमुळेच आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीची घटना घडली, त्यावेळी सर्वजण झोपेत होते, त्यामुळे कोणालाच प्राण वाचवण्याची संधी मिळाली नाही. या घरातील एक मुलगा बाहेर आल्याने तो या आगीतून बचावला.
या दुर्घटनेत घरात असलेल्या सहा जणांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले. मध्यरात्रीपासून आग विझवण्यासाठी आणि घरातील अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
घरात मोठ्या प्रमाणात धूर साचल्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे गावकऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने घराच्या भिंती फोडून धूर बाहेर जाण्यासाठी मार्ग तयार करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनंतर एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दिवाळीदिवशी राज्यात जवळपास 70 ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. विरार, ठाणे, अंधेरी, डोंगरी, विद्याविहार आदि भागात रहिवाशी इमारतींना आगी लागल्या. त्याचवेळी भायखळा डोंगरी भागात दुकानांना आगी लागण्याच्या घटना घडल्या. या अग्नितांडवात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
