छत्रपती संभाजीनगर. Chhatrapati Sambhajinagar News: वाळूज परिसरात गॅस सिलिंडरच्या टंचाईने संतापलेल्या एका नागरिकाने थेट आत्मविध्वंसाचा मार्ग अवलंबल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रांजणगाव शेपू येथील कमल गॅस एजन्सीसमोर आज दुपारी सुमारास हा प्रकार घडला आहे.

बालचंद नेमाने (वय 50, रा. रांजणगाव) हे गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरसाठी एजन्सीच्या फेऱ्या मारत होते. मात्र, वारंवार हेलपाटे मारूनही सिलेंडर मिळत नसल्याने त्यांचा संताप अनावर झाला. “घरी बायकोला काय सांगू?” अशी आर्त हाक देत त्यांनी एजन्सीबाहेरच स्वतःचं डोकं फोडून घेतलं.

या धक्कादायक प्रकारामुळे एजन्सीबाहेर मोठा गोंधळ निर्माण झाला. उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या घटनेमुळे गॅस सिलेंडरच्या टंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत गरजांसाठी अशा प्रकारे त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासन आणि गॅस वितरण यंत्रणेवर संताप व्यक्त केला जात आहे.

प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्चिन्ह-

नागरिकांनी नेमकं किती सहन करायचं? आणि या व्यवस्थेचा बोजा सामान्य माणसाने अजून किती दिवस उचलायचा असा सवाल प्रशासनाला केला आहे.