जेएनएन, नांदेड. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात मोठी धक्कादायक घटना घडली आहे. कावलगुडा गावातील भवानी माता मंदिरावर आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्यातील जेवणातून तब्बल 200 जणांना अन्न विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे.
भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था
माहितीनुसार, कावलगुडा येथे काल भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दुपारी 12 वाजल्यापासून मंदिर परिसरात भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या भंडाऱ्यात दिल्या गेलेल्या आंबीलमुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सायंकाळच्या सुमारास काही भाविकांना पोटदुखी, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला काहींनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आणि घरी परतले. मात्र रात्रीपर्यंत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली.
गंभीर नागरिकांना शासकीय रुग्णालयात हलवले
परिस्थिती गंभीर होताच मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि लहान मुलांना उमरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ उपचार सुरू केले असून, चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
विषबाधा कशामुळे झाली याचा शोध सुरु
दरम्यान, आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. भंडाऱ्यात वापरण्यात आलेल्या अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, नेमकी विषबाधा कशामुळे झाली याचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, भंडाऱ्यांच्या आयोजनात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
