जेएनएन, अकोला: अकोला महानगरपालिकेत भाजपने मोठा राजकीय डाव टाकत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा करून घेतला आहे. शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी गट आणि अपक्ष नगरसेवकांच्या मदतीने भाजपकडून तब्बल 44 नगरसेवकांचा गट विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे अधिकृतपणे नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे अकोल्यात महायुतीची सत्ता स्थापन होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

भाजपने “शहर सुधार आघाडी” या नावाखाली गट नोंदणी केली असून, सादर करण्यात आलेल्या यादीत भाजपचे 38 नगरसेवक आहेत. यासोबतच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), अपक्ष नगरसेवक तसेच राज्यात विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 3 नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचा समावेश असल्याने मोठी राजकीय चर्चा रंगली आहे. 

विशेष म्हणजे, सुमारे आठवडाभरापूर्वी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नगरसेवकांशी सत्तास्थापनेसाठी बोलणी सुरू असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. अखेर त्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालं असून, भाजपने आकड्यांचा खेळ आपल्या बाजूने फिरवण्यात यश मिळवलं आहे. 

दरम्यान, अकोला महापालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने सत्ता स्थापननेचा दावा केला होता. मात्र भाजपने अचानक हालचाली करत आवश्यक संख्याबळ जमा केल्याने हे सर्व दावे फोल ठरले आहेत. आता भाजप नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता अकोला महानगरपालिकेत स्थापन होणार, हे स्पष्ट झालं आहे. 

भाजपच्या या यशामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, विशेषतः शरद पवार गटातील नगरसेवकांच्या सहभागामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. पुढील काही दिवसांत महापौर, उपमहापौर निवड आणि सत्तावाटपावरून आणखी हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.