मुंबई. SSC Supplementary Exam 2026 Date: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या दहावी मार्च 2026 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, आता जून-जुलै 2026 मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी, गुण सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थी तसेच खाजगी उमेदवारांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.
मंडळाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार पुनर्परीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत अर्ज करणारे विद्यार्थी तसेच आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणारे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज प्रक्रिया कधीपर्यंत?
पुरवणी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 12 मे ते 21 मे 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. तर विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 22 मे ते 25 मे 2026 पर्यंत असणार आहे.
विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शाळा किंवा मान्यताप्राप्त केंद्रामार्फत अर्ज सादर करावेत, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
कोणाला अर्ज करता येणार?
या परीक्षेसाठी खालील प्रकारातील विद्यार्थी अर्ज करू शकतात
* मार्च 2026 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी
* एखाद्या विषयात अपयशी ठरलेले पुनर्परीक्षार्थी
* श्रेणीसुधार (Grade Improvement) योजनेअंतर्गत गुण वाढवू इच्छिणारे विद्यार्थी
* खाजगी उमेदवार
* आयटीआय विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया!
विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे, फोटो, स्वाक्षरी तसेच मागील परीक्षेचा आसन क्रमांक तयार ठेवणे आवश्यक आहे. अर्ज भरल्यानंतर शुल्क भरल्याशिवाय अर्ज अंतिम मानला जाणार नाही.
मंडळाने विद्यार्थ्यांना अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी लवकर अर्ज करणे फायदेशीर ठरणार आहे.
परीक्षा कधी होणार?
दहावीची जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षा राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार असून, परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांना अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या असे आवाहन करण्यात आले आहे.
