जेएनएन, मुंबई. राज्यातील बहुतांश शाळांना येत्या आठवड्यात एक अतिरिक्त सुट्टी मिळणार आहे. 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिका क्षेत्रात मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने अनेक ठिकाणी शाळांमध्येच मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजेच 15 जानेवारी रोजी राज्यातील बहुतांश शाळा बंद राहणार आहेत.

विशेष सुट्टी जाहीर करावी

दरम्यान, आता विद्यार्थ्यांना 16 जानेवारीलाही सुट्टी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवडणूक कामांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी दिवसभर सेवा बजावणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मतदानानंतरच्या दुसऱ्या दिवशी विश्रांती मिळावी, यासाठी विशेष सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘हे कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक ठरेल’

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचचे समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी राज्य सरकार आणि शिक्षण विभागाकडे अधिकृत मागणी केली आहे. मतदानाच्या दिवशी सकाळपासून उशिरापर्यंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कामावर असतात. मतदान साहित्य जमा करणे, अहवाल सादर करणे, मतपेट्या व ईव्हीएम जमा करणे या प्रक्रिया अनेकदा मध्यरात्रीपर्यंत सुरू राहतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी थेट शाळा सुरू करणे कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक ठरेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

    16 जानेवारी रोजी विशेष सुट्टी जाहीर करावी

    या पार्श्वभूमीवर 16 जानेवारी रोजी विशेष सुट्टी जाहीर करावी, जेणेकरून निवडणूक कामातून परतलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना पुरेशी विश्रांती मिळेल आणि शाळांचे नियोजन सुरळीतपणे करता येईल, अशी मागणी करण्यात आली आहे. 

    सध्या या मागणीवर शासन आणि शिक्षण विभाग काय निर्णय घेतात, याकडे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.