पुणे. Maharashtra Board SSC HSC Result 2026: सीबीएसईचा 10 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी व बारावी परीक्षांच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांच्या नजरा लागल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावी व दहावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च 2026 दरम्यान घेण्यात आल्या होत्या. आता विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता असून त्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. 10 वी आणि 12 वीचा निकाल कधी लागणार याबद्दल विद्यार्थी आणि पालक चर्चा करत आहेत, या निकालांबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.
12 वीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या काळात तर 10 वीची बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीमध्ये पार पडली. दोन्ही परीक्षा संपून आता महिनाभराचा काळ उलटला आहे. त्यामुळे परीक्षांचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थी व त्यांच्या पालकांना हूरहूर लागली आहे. निकाल लागताच पुढील प्रवेशासाठी प्रयत्न करावे लागतात त्यामुळे लवकर निकाल जाहीर करावेत, अशी पालकांची अपेक्षा असते. सध्या एप्रिल महिना अर्धा संपला तरी बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार याच महिन्याच्या अखेरीस 12 वीचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो तर पुढच्या महिन्याच्या म्हणजेच मे महिना सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यातच इयत्ता 10वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सध्या गुणसंकलन आणि रिपोर्टिंगचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या अखेरीस 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
पेपर तपासणीचे काम कुठंवर?
दरम्यान, 12 वी परीक्षांचे पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात असून 10 वीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांची देखील तपासणी वेगाने सुरू आहे. पेपर तपासणीचे व अंतिम मुल्यांकनाचे उर्वरित काम पुढील काही दिवसांत पूर्ण होणार असून, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 10 वीचा निकाल लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिना दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे.
15 लाख विद्यार्थांनी दिली बारावीची परीक्षा
पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत यंदा 15,32,487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यामध्ये 8,20,229 मुले, 7,12,240 मुली, तर 18 तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कुठे पाहायचा निकाल ?
बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केल्यानंतर त्या दिवशी खालील लिंकवर विद्यार्थ्यांना निकाल चेक करता येऊ शकेल.
कसा पाहायचा निकाल?
- निकाल जाहीर झाल्यावर तो mahresult.nic.in, hscresult.mkcl.org किंवा sscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाइट्सला भेट द्या.
- विद्यार्थ्यांना फक्त आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल.
- त्यानंतर त्यांना त्यांचा निकाल वेबसाईटवर दिसेल.
- विद्यार्थांनी त्याची एक प्रत काढून घ्यावी किंवा निकाल सेव्ह करून ठेवावा.
- बोर्डाच्या mahahsscboard.in या साइटवरही माहिती मिळू शकणार आहे.
- मागील तीन वर्षांचा अनुभव काय सांगतो?
गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये बारावीचा निकाल 5 मे रोजी लागला होता. यावेळी एक आठवडा आधी लागण्याची शक्यता आहे.
