नवी दिल्ली: Repo Rate Cut : आरबीआयने शुक्रवारी त्यांच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात 0.25 टक्के कपात करण्याची घोषणा केली. एमपीसीची द्वैमासिक पतधोरण बैठक बुधवारपासून सुरू झाली होती.

रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात 0.25% कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांच्या नेतृत्वाखालील MPC ने रेपो दर 25 बीपीएस ने कमी करून 5.25% केला आहे. या निर्णयामुळे गृहकर्ज आणि इतर कर्जांवरील EMI कमी होतील, ज्यामुळे व्यक्तींवरील आर्थिक भार कमी होईल. रेपो दर कपातीचा अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होईल, कारण स्वस्त कर्जांमुळे मागणी वाढेल आणि आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल.

धोरणात्मक भूमिका 'तटस्थ' ठेवली आहे. ग्रामीण मागणीत सुधारणा होत आहे. शहरी मागणीत सातत्याने सुधारणा होत आहे. यावेळी  2025 हे वर्ष आव्हानांनी भरलेलं असल्याचं म्हणत आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, बँकिंग क्षेत्रात उत्तम काम झाली आहे.  गैर-अन्न, बँक कर्जे आणि उच्च क्षमता वापरामुळे खाजगी गुंतवणूक वाढत असून, गुंतवणूक व्यवहार चांगल्या स्थितीत आहेत. दर कपातीनंतर आता रेपो दर 5.25 टक्क्यांवर आला आहे

आजच्या MPC बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. रेपो रेट कमी (Repo Rate Cut) होऊन व्याज दर स्वस्त होणार का, याची उत्सुकता होती. महागाई घटली, जीडीपी वाढ वेगाने होत आहे आणि रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत असून सध्या तो 90 च्या जवळ गेला आहे.  या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कट करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. गेल्या काही महिन्यांत आरबीआयनं रेपो दरात तीन टप्प्यांमध्ये एकूण 100 बेसिस पॉईंट्सनी कपात केली होती. यावेळीही रिझर्व्ह बँकेनं सर्वसामान्यांना दिलासा देत रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात करुन तो 5.25 टक्क्यांवर आणला.

आरबीआयने जीडीपी वाढीचा अंदाज किती वर्तवली?

रिझर्व्ह बँकेने  2025-26 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) अंदाज 7.3% केला आहे, जो पूर्वी 6.8% होता.

    आर्थिक वर्ष 26 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी, मध्यवर्ती बँकेने विकासदराचा अंदाज 6.4% वरून 7.0%  पर्यंत वाढवला. आर्थिक वर्ष 26 च्या चौथ्या तिमाहीचा अंदाजही 6.2% वरून 6.5%  पर्यंत वाढवला. त्याचप्रमाणे, आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीचा अंदाज 6.4% वरून 6.7% पर्यंत वाढवला, तर आर्थिक वर्ष 27 च्या दुसऱ्या तिमाहीचा विकासदर 6.8% असा अंदाज वर्तवला गेला.

    या वर्षी रेपो दर किती वेळा कमी करण्यात आला आहे?

    2025 मध्ये आरबीआयने चार वेळा रेपो दरात कपात केली आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत आरबीआयने व्याजदर 6.5% वरून 6.25% पर्यंत कमी केले. जवळजवळ 5 वर्षांनी चलनविषयक धोरण समितीने ही कपात केली. एप्रिलमध्ये दुसऱ्यांदा व्याजदरात 0.25% कपात करण्यात आली. जूनमध्ये तिसऱ्यांदा व्याजदरात 0.50% कपात करण्यात आली. आता पुन्हा एकदा तो 0.25% ने कमी करण्यात आला आहे. म्हणजेच, चलनविषयक धोरण समितीने तीन वेळा व्याजदरात 1.25% कपात केली आहे.