नवी दिल्ली- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी सर्व राज्य सरकारांना बाईक टॅक्सी सेवांना परवानगी देण्याचे आवाहन केले. या सेवेमुळे सुमारे 8 कोटी लोकांना रोजगार मिळू शकेल, असेही त्यांनी म्हटले.

महामार्ग बांधकाम आणि खाणकामात गुंतलेल्या चालक आणि उच्च-जोखमीच्या कामगारांना मोफत कामाच्या ठिकाणीच वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशन देणाऱ्या 'सुरक्षा' नावाच्या प्रायोगिक कार्यक्रमाच्या शुभारंभावेळी गडकरी यांनी ही टिप्पणी केली.

हा कार्यक्रम महाराष्ट्रातील नागपूर-कामठी प्रदेश (राष्ट्रीय महामार्ग-44) आणि चंद्रपूर खाण पट्ट्यात 150 किलोमीटर परिसरात राबविण्यात येईल. यामध्ये 10,000 लोकांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट आहे.

त्यांनी गाडी चालकांच्या आरोग्यावर भर दिला आणि सांगितले की रस्ते सुरक्षेसाठी चालकांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी यावर जोर दिला की त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे डोळ्यांची काळजी आणि इतर आरोग्य समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

बाईक टॅक्सीबद्दल काय म्हणाले गडकरी?

गडकरी यांनी निदर्शनास आणून दिले की, केंद्र सरकारने खाजगी दुचाकींना (स्कूटर्स आणि मोटरसायकल) प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे, परंतु काही राज्ये अजूनही त्याला परवानगी देत ​​नाहीत. वाहतूक हा राज्याचा विषय आहे. त्यांनी राज्यांना आवाहन केले की, त्यांनी बाईक टॅक्सीला परवानगी द्यावी, कारण त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक लोकांना उपजीविका मिळेल.

    वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निगेटिव पॉईंट सिस्टम-

    गडकरी म्हणाले की, वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठी नकारात्मक गुणप्रणाली लागू करण्याकरिता मोटार वाहन कायद्यात सुधारणा केली जाईल. प्रत्येक उल्लंघनासाठी गुण वजा केले जातील. एक विशिष्ट मर्यादा ओलांडल्यास वाहन चालविण्याचा परवाना निलंबित किंवा रद्द केला जाईल.

    वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना (हॅबिटुअल ऑफेंडर्स) विरुद्ध ही प्रणाली जबाबदार ड्रायव्हिगला प्रोत्साहन देईल.

    रस्त्यांवरील अपघातांची वाढती संख्या आणि नियमांचे उल्लंघन लक्षात घेता, या प्रणालीमुळे चालकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होईल, असेही गडकरी म्हणाले. रस्ते सुरक्षा आणि रोजगार निर्मिती या दोन्हीसाठी या घोषणा महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

    हे ही वाचा - 8th Pay Commission बाबत मोठी अपडेट, टर्म ऑफ रेफरन्समध्ये होणार बदल? 2026 पूर्वी निवृत्त होणाऱ्या पेन्शनधारकांना मिळणार DoPT ची साथ