चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईपासून दक्षिणेला सुमारे 60 किमी अंतरावर असलेल्या मदुरंतकमजवळील एका टेकडीवरील मंदिरातून भगवान मुरुगन यांची एक अनमोल पाचूची मूर्ती चोरीला गेली आहे. चोरांनी मंगळवारी रात्री तीन स्तरीय सुरक्षा घेरा भेदला, अलार्म बंद केला आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे पेंट मारून मूर्ती लांबवली.
भक्तांमध्ये नाडू पलानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेरुंगकरनई गावातील श्री मरगथा बाला दंडायुधपाणी मुरुगन मंदिरात ही चोरी झाली. मुख्य देवतेची मूर्ती 2.25 फूट उंच असून ती पूर्णपणे पाचूची बनलेली आहे. ती म्हैसूरहून आणून 2008 साली मंदिरात स्थापित करण्यात आली होती.
पोलीस काय म्हणाले?
मूर्तीचे मूल्य लक्षात घेता, गर्भगृहात जाण्याचा मार्ग तीन मजबूत सुरक्षा दरवाजे आणि लोखंडी शटर लावून सुरक्षित करण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले. घुसखोरी झाल्यास सूचना देण्यासाठी अलार्म यंत्रणाही बसवण्यात आली होती. मंदिराच्या आजूबाजूला मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले होते.
पोलिसांना संशय आहे की चोरांच्या टोळीला मंदिराची आणि त्याच्या सुरक्षा व्यवस्थेची सखोल माहिती होती, जी त्यांनी भाविकांच्या वेशात केलेल्या पाहणीदरम्यान मिळवली असावी. तपासकर्त्यांनी सांगितले की, चोरांनी मागच्या दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी मंदिरामागे बनवलेल्या एका मोठ्या मूर्तीवर चढून दरवाजापर्यंत आले व त्यानंतर ते गर्भगृहात पोहोचले.
त्रिस्तरीय सुरक्षा कशी भेदली -
चोरांनी तीन सुरक्षित लोखंडी दरवाजे तोडून गर्भगृहात प्रवेश केला. पोलिसांनी सांगितले की, मूर्ती आसनावरून काढण्यापूर्वी त्यांनी सुरक्षा अलार्म बंद केला होता, जेणेकरून तो वाजणार नाही. मूर्ती घेऊन पळून जाण्यापूर्वी, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे-पेंट मारला, जेणेकरून त्यांच्या हालचाली आणि ओळख रेकॉर्ड होऊ नये. चोरानी पहाटे सुमारे दीड वाजता मंदिरात चोरी केली.
पोलिसांच्या मते, ज्या पद्धतीने सुरक्षा यंत्रणा बंद करण्यात आली, त्यावरून असे सूचित होते की चोरांना मंदिराच्या व्यवस्थेची पूर्वकल्पना असावी. पोलिसांनी सांगितले की, मंदिरात रात्रीच्या वेळी तळमजल्यावर गस्त घालणारा फक्त एकच सुरक्षा रक्षक होता.
पोलिसांना केव्हा कळले?
बुधवारी सकाळी पुजारी आणि मंदिर प्रशासक आले असता त्यांना मूर्ती गायब झाल्याचे आढळले, तेव्हा चोरी उघडकीस आली. त्यांनी तात्काळ चिथमूर पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मंदिराची पाहणी केली, तर फोरेंसिक एक्सपर्ट्सनी गर्भगृह आणि आजूबाजूच्या परिसरातून बोटांचे ठसे व इतर पुरावे गोळा केले. एका श्वानपथकाचाही वापर करण्यात आला.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चोरांचा शोध घेण्यासाठी, मूर्ती परत मिळवण्यासाठी आणि या चोरीत मंदिरातीलच लोकांच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मंदिराचे पुजारी आदल्या रात्री चोरांपासून बचावासाठी लावलेला अलार्म चालू करायला विसरले होते.
या चोरीत आंतरराज्यीय टोळीचा सहभाग होता की मूर्तींची तस्करी करणाऱ्या संघटित नेटवर्कने ही चोरी केली, याचा तपास पोलीस करत आहेत.
