नवी दिल्ली - राजधानी दिल्ली पुन्हा एकदा 'निर्भया' सारख्या प्रकरणाने हादरली आहे. एका 16 वर्षीय 11 वीच्या विद्यार्थिनीवर बलात्काराची घटना समोर आली आहे. धावत्या बसमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरने बलात्कार केल्यानंतर पीडितेला काश्मिरी गेटजवळील रिंग रोडवर सोडून ते पसार झाले. पीडितेच्या तक्रारीवरून काश्मिरी गेट पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, सुमारे 47 किलोमीटर अंतरापर्यंत धावत्या बसमध्ये नराधम या अल्पवयीन मुलीचे लटके तोडत राहिले.
चुकीच्या स्टॉपवर उतरल्यामुळे मागितली होती मदत-
उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील रहिवासी असलेली 16 वर्षांची 11 वीची विद्यार्थिनी आई रागावण्यामुळे नाराज होऊन 4 ऑगस्ट रोजी कोणालाही न सांगता नोएडाहून निघाली होती. रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस आणि अंधार असल्यामुळे ती चुकून 'परी चौक' येथे उतरली. तिथून पुढे जाण्यासाठी तिने एका स्लीपर बसला हात करून बस थांबली. नोएडा सेक्टर-63 कडे जाणार असल्याचे सांगून ती बसमध्ये चढली.
बसमध्ये अन्य कोणीही प्रवासी नव्हते -
बसमध्ये चढल्यानंतर पीडितेला लक्षात आले की आतमध्ये एकही प्रवासी नव्हता. बस सुरू होताच कंडक्टरने मुलीशी छेडछाड सुरू केली. त्यानंतर चालक आणि कंडक्टर या दोघांनी मिळून धावत्या बसमध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर आरोपींनी तिला मध्यरात्री काश्मिरी गेट बस स्थानकाजवळील रिंग रोडवर उतरवले आणि तिथून पळ काढला.
सीसीटीव्ही (CCTV) फुटेजवरून आरोपींना बेड्या -
घटनेनंतर लगेचच पीडितेने काश्मिरी गेट पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत सांगितली. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आणि तिच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कार, अपहरण व मारहाणीच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई करत आरोपी चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप यांना तिमारपूर पार्किंगमधून अटक केली. गुन्ह्यात वापरलेली स्लीपर बसही पोलिसांनी जप्त केली आहे.
फॉरेन्सिक टीम गोळा करणार पुरावे
ज्या बसमध्ये हे कृत्य घडले, तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बसच्या आत ड्रायव्हरच्या सीटजवळ स्टिअरिंगवर ब्लँकेट ठेवलेली दिसत होती. आत सीट्समधील मोकळ्या जागेत एक चादरही पडलेली आढळली. ही बस 'विश्वनाथ ट्रान्सपोर्ट कंपनी'ची आहे. बसचा क्रमांक UP83E T3789 असा आहे. तिच्या खिडक्यांवर पडदे लावलेले होते. ही एसी स्लीपर बस सध्या पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतली आहे. आता फॉरेन्सिक टीम याची तपासणी करून पुरावे गोळा करेल.
