जेएनएन, पुणे. लोहगडावर फिरायला गेलेल्या केतन अग्रवालची तिच्या होणाऱ्या बायकोने सीया गोयल ने हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ती आणि तिचा पूर्व प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलेले आहे. आता या प्रकरणात आखणी एका 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. लोहगडावर झालेल्या हृदयद्रावक प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. आता आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेलल्याने प्रकरणात नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव रितेश हांगे असे असून, तो मृत अग्रवाल यांची होणारी पत्नी सिया गोयल हिचा कथित प्रियकर चेतन चौधरी याचा मित्र आहे.
चौधरी आणि गोयल यांच्यानंतर या प्रकरणात अटक झालेला हांगे हा तिसरा व्यक्ती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर गोयल (20) आणि चौधरी (22) यांनी अग्रवाल यांना कड्यावरून खाली ढकलले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
"तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, केतन अग्रवाल यांच्या हत्येचा कट रचण्यात रितेशचा सहभाग होता," असे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी सांगितले. हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली हांगेला अटक करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अग्रवाल यांच्या हत्येचा कट रचण्यात हांगेचा चौधरी आणि गोयल यांच्यासोबत सहभाग होता. "केतनचे हात-पाय मोडून त्याला जखमी करणे आणि त्यानंतर त्याचा कायमचा काटा काढणे, या गोयल आणि चौधरी यांच्या आधीच्या योजनेची त्याला कल्पना होती. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर हत्या केल्यानंतर चेतनने रितेशशी संपर्क साधून त्याला त्याबद्दल माहिती दिली होती," असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, अग्रवाल आणि गोयल यांचा फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला होता, परंतु ती कथितरीत्या चौधरीच्या संपर्कात होती.
अग्रवाल त्यांच्या नात्यात अडथळा ठरत असल्याने गोयल आणि चौधरी यांनी त्याला संपवण्याचा कट रचला होता, असा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
