जेएनएन, पुणे: चाकणसह पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये उद्योगांना शासकीय मंजुरी, विविध परवानग्या आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या सेवांबाबत येणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र ‘उद्योग तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे उद्योगांच्या प्रलंबित तक्रारींचा वेळेत निपटारा होऊन उद्योगांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या कमी माराव्या लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
उच्चस्तरीय समिती स्थापन
चाकण औद्योगिक परिसरात रस्त्यांची दुरवस्था, वाढती वाहतूक कोंडी, अवजड वाहनांची मोठी संख्या आणि वाहतूक व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर चाकण औद्योगिक परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी आणि एकूण व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीमध्ये संबंधित शासकीय विभाग, स्थानिक प्रशासन आणि औद्योगिक क्षेत्राशी निगडित यंत्रणांमध्ये समन्वय साधून चाकणमधील पायाभूत सुविधांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. उद्योगांमधून होणाऱ्या वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांवर निर्माण होणारी कोंडी कमी करणे, पर्यायी वाहतूक व्यवस्था, रस्त्यांची दुरुस्ती आणि दीर्घकालीन नियोजनाबाबत समिती काम करणार आहे.
उद्योग तक्रार निवारण कक्ष
चाकण परिसरातील अनेक उद्योगांनी गेल्या काही काळात वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि विविध पायाभूत सुविधांमुळे उत्पादन आणि मालवाहतुकीवर परिणाम होत असल्याची तक्रार केली होती. या समस्यांमुळे उद्योगांचे आर्थिक नुकसान होत असून काही उद्योग स्थलांतराचा विचार करीत असल्याचीही चर्चा होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि प्रशासनाने उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
नव्या ‘उद्योग तक्रार निवारण कक्षात’ उद्योगांना शासकीय मंजुरी, विविध विभागांकडील परवानग्या तसेच प्रशासनाशी संबंधित इतर सेवांबाबतच्या अडचणी मांडता येणार आहेत. प्राप्त तक्रारींची नोंद घेऊन त्या संबंधित विभागांकडे पाठविणे आणि त्यांच्या निराकरणाचा पाठपुरावा करणे, ही या कक्षाची प्रमुख जबाबदारी असणार आहे.
हेल्पलाईन नंबर जारी
उद्योगांनी तक्रारींसाठी 020-26130097 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा collector.pune@maharashtra.gov.in या ई-मेलवर माहिती पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
चाकणसह पुणे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी प्रशासनाकडून ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. उद्योगांच्या समस्या वेळेत मार्गी लागल्यास उत्पादन, रोजगार आणि नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल. आता नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण कक्ष आणि उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चाकणच्या औद्योगिक समस्या कितपत वेगाने सुटतात, याकडे उद्योगजगताचे लक्ष लागले आहे.
