पुणे. पोक्सो कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात पसार झालेला बीडचा राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुकाराम करांडे याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करांडे हा राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू होता. त्याच्या आत्महत्येमुळे क्रीडा वर्तुळासह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, तुकाराम करांडे याच्याविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणानंतर तो पसार झाला होता. दरम्यान, तो काही दिवसांपूर्वी बार्शी रोड परिसरात अवैध पिस्तूल बाळगताना पोलिसांना आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले होते.
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
तुकाराम करांडे हा राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडू होता. त्याने दोन वेळा राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत स्थान मिळवत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे त्याची क्रीडा क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली होती.
तुकाराम यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, संबंधित पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. पोक्सो प्रकरण, अवैध पिस्तूल बाळगल्याचा गुन्हा आणि त्यानंतरची आत्महत्या या घटनांमुळे या प्रकरणाकडे आता गांभीर्याने पाहिले जात आहे. पोलिस तपासातून पुढील माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
