पुणे. Pune News: पुण्यातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने (ANTF) मोठी कारवाई केली आहे. कोंढवा परिसरात छापा टाकून पोलिसांनी तब्बल अडीच किलो गांजा जप्त केला. विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या तब्बल 30 जणांवरही पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.

कोंढवा परिसरात गांजाची खुलेआम विक्री सुरू असल्याची माहिती ANTFला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित परिसरावर पाळत ठेवून कारवाईचे नियोजन केले. त्यानंतर संशयितांवर छापा टाकण्यात आला असता त्यांच्याकडून सुमारे अडीच किलो गांजा जप्त करण्यात आला.

कारवाईच्या वेळी गांजा खरेदी करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी अशा तब्बल ३० जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई सुरू केली आहे. हे सर्वजण केवळ ग्राहक होते की या अमली पदार्थांच्या तस्करीच्या साखळीशी त्यांचा आणखी काही संबंध आहे, याचा तपास केला जात आहे.

या प्रकरणात गांजा कुठून आणला जात होता, त्याचा पुरवठादार कोण आहे, पुणे शहरातील इतर कोणत्या भागात या नेटवर्कची पाळेमुळे पसरली आहेत, याचा शोध ANTFकडून घेतला जात आहे. आरोपींच्या मोबाईलमधील संपर्क, आर्थिक व्यवहार आणि पूर्वीच्या गुन्हेगारी नोंदींचीही तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.

कोंढवा आणि स्वारगेट परिसरात गांजा विक्रीच्या संघटित टोळ्यांवर यापूर्वीही पोलिसांनी कारवाई केली असून, या भागातील अमली पदार्थांचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी पोलिसांकडून कारवाई तीव्र करण्यात आली आहे. अलीकडील कारवायांमुळे पुण्यात गांजा खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्यांवरही पोलिसांनी थेट कारवाई केली आहे. 

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य तस्कर आणि त्याच्या संपर्कातील अन्य व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून, चौकशीत आणखी नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.