जेएनएन, पुणे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे.

पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि काँग्रेसची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. 

या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच पुण्यातील विद्यार्थी राजकारण आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

दोन्ही गटांकडून एकमेकांवर मारहाणीचे आरोप

‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. या वादानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि परिस्थिती चिघळल्याचा आरोप आहे. या घटनेत ABVP आणि NSUI या दोन्ही संघटनांनी एकमेकांवर मारहाण केल्याचे आरोप केले आहेत.

घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या प्रकरणातील नेमकी पार्श्वभूमी आणि वाद कशामुळे सुरू झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही. पोलिसांकडून या घटनेची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

    हर्षवर्धन सपकाळांचा भाजप आणि विरोधकांवर निशाणा 

    या घटनेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता, सुविधा आणि विविध समस्यांबाबत मोठा असंतोष असल्याचा दावा त्यांनी केला. 

    सपकाळ म्हणाले की, “पुण्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता, सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवरून मोठा असंतोष आहे. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कार्यक्रम उधळून लावण्यासाठी आणि स्टंट करण्यासाठी भाडोत्री गुंड पाठवण्याचा कट रचला गेला आहे.”

    राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधक अस्वस्थ झाले असून, विद्यार्थ्यांमध्ये हिंसाचार घडवून कार्यक्रमाचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप सपकाळ यांनी केला. 

    विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधींचा संवाद 

    ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. शिक्षणाची गुणवत्ता, वाढती फी, रोजगाराच्या संधी, शैक्षणिक सुविधा आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे.