जेएनएन,नाशिक:  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गवर दरोडेखोरांनी दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मलढोण आणि दुसंगवाडी शिवाराजवळ काही वाहनांना अडवून लुटमार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक 538 ते 543 दरम्यान हा लुटीचा प्रकार घडला. दरोडेखोरांनी रस्त्यावर लोखंडी वस्तू टाकून वाहनांचे नुकसान केल्याचे सांगण्यात येत आहे. वाहन थांबल्यानंतर 7 ते 8 जणांच्या टोळीने प्रवाशांना मारहाण करत लुटमार केली, अशी माहिती पीडित किरण खंदारे यांनी दिली आहे.

लोखंडी वस्तू टाकून वाहनांना अडवलं
दरोडेखोरांनी आधी महामार्गावर लोखंडी वस्तू टाकल्या. त्यामुळे वाहनांचे नुकसान झाले आणि वाहनचालकांना गाडी थांबवावी लागली. वाहन थांबताच टोळीने प्रवाशांना घेरल्याची माहिती आहे. त्यानंतर मारहाण करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू आणि रोकड लुटण्यात आली.

या घटनेत सोन्याची अंगठी आणि 35 हजार रुपयांची रोकड लुटल्याची माहिती पीडितांकडून देण्यात आली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांची लूट
विशेष म्हणजे, ज्या व्यक्तींसोबत लुटमारीचा प्रकार घडला, ते आमदार संतोष बांगर यांचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेला राजकीय वर्तुळातही महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, दरोडेखोरांनी अशाच पद्धतीने आणखी वाहनांना लक्ष्य केले आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज, टोल नाक्यांवरील कॅमेरे तसेच घटनास्थळाच्या आसपासच्या हालचालींच्या आधारे पोलिसांकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे.

    समृद्धी महामार्गावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
    समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग मोठा असतो. अशा परिस्थितीत रस्त्यावर लोखंडी वस्तू टाकून वाहन थांबवणे हे अत्यंत धोकादायक आहे. वाहन थांबल्यानंतर प्रवाशांना मारहाण करून लुटमार केली जात असल्याने महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.