जेएनएन, नाशिक: आगामी काळात देशात सत्ताबदल नक्की होणार आहे. मात्र हा बदल काँग्रेसमुळे किंवा कोणत्याही एका राजकीय पक्षामुळे होणार नाही, तर गेल्या 12 वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारामुळेच देशात सत्ताबदलाची परिस्थिती निर्माण होईल, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 2029 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. त्यामुळे भाजपकडून आतापासूनच पुढील नेतृत्वाचा चेहरा बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. देशातील राजकीय परिस्थिती वेगाने बदलत असून सत्ताधारी पक्षाच्या अंतर्गतही आगामी काळातील नेतृत्वावर चर्चा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही चव्हाण यांनी निशाणा साधला. अमित शहा यांना उपपंतप्रधान व्हायचे आहे, असा दावा करत केंद्रातील भाजप नेतृत्वात पुढील काळात मोठे बदल होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील जनतेमध्ये केंद्र सरकारच्या धोरणांबाबत नाराजी वाढत असल्याचा दावा करत चव्हाण म्हणाले की, सत्ताबदलासाठी विरोधी पक्षांनी विशेष प्रयत्न करण्याचीही गरज भासणार नाही. गेल्या बारा वर्षांतील सरकारच्या निर्णयांचा आणि कारभाराचा परिणामच आगामी लोकसभा निवडणुकीत दिसून येईल. “मोदींच्या कारभारामुळेच सत्ताबदल होईल,” असे  वक्तव्य चव्हाण यांनी केले आहे.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वीही मोदी सरकारकडे 2029 च्या जनादेशाबाबत आत्मविश्वास नसल्याचा दावा केला होता आणि केंद्रातील नेतृत्वावर टीका केली.

हेही वाचा: Ganeshotsav 2026: चाकरमानांसाठी गुडन्यूज! गणपती उत्सवाच्या एकेरी गट आरक्षणावरील 30 टक्के अतिरिक्त शुल्क रद्द