नागपूर. Nagpur School Closed: नागपूर शहरातील 18 नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.धमकीच्या ई-मेलमध्ये 31 ऑगस्टचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित शाळांनी आज, 31 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना शाळेत न बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. काही शाळांनी ऑनलाइन वर्ग घेण्याचा निर्णयही घेतला आहे. 

18 ऑगस्टला आला होता धमकीचा ई-मेल

ही धमकी अचानक मिळालेली नसून नागपुरातील अनेक शाळांना धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले होते. माहितीनुसार 12 हून अधिक शाळांना असे ई-मेल मिळाले होते. त्यानंतरच्या तपासात शहरातील 18 शाळांना आणि इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांना धमकी देण्यात आल्याचे समोर आले. 

ई-मेलमध्ये शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे ई-मेल मिळताच शाळा प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली आणि तातडीने सुरक्षा यंत्रणा सक्रिय करण्यात आली.

बॉम्ब शोधक पथकाकडून कसून तपासणी

धमकीची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी संबंधित शाळांमध्ये बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि श्वान पथक पाठवले. शाळेच्या इमारती, वर्गखोल्या, कार्यालये, परिसर तसेच ये-जा करण्याच्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली. मात्र तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळले नाही. 

    पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर धमकीला बनावट किंवा अफवा पसरविण्याचा प्रयत्न मानले असले, तरी 31 ऑगस्टचा उल्लेख असल्यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही जोखीम न घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

    पालकांमध्ये भीतीचे वातावरण

    31 ऑगस्टचा उल्लेख असलेल्या ई-मेलमुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलांच्या सुरक्षेच्या कारणास्तव अनेक पालकांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधला. काही शाळांनी विद्यार्थ्यांना परिसरात न बोलावता ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

    सायबर पोलिसांकडून ई-मेलचा तपास

    धमकीचा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला, याचा तपास नागपूर पोलिसांच्या सायबर पथकाकडून सुरू आहे. ई-मेलचा तांत्रिक तपशील, IP अॅड्रेस आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी संबंधित ई-मेल सेवा प्रदात्याशीही पोलिस संपर्क साधत आहेत. 

    शाळांच्या सुरक्षेत वाढ

    या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी शाळांना सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी परिसराची तपासणी करणे, संशयास्पद किंवा बेवारस वस्तू आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवणे आणि आवश्यकतेनुसार सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.