मुंबई/नागपूर Maharashtra Weather Update Today: राज्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला पावसाने पुन्हा जोर पकडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने 3 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही भागांत वातावरण अधिक सक्रिय राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या जिल्हानिहाय इशारा प्रणालीमध्ये 3 सप्टेंबरसाठी स्वतंत्र इशारे जारी करण्यात आले आहेत.
अमरावती आणि गोंदियाला दक्षतेचा इशारा
अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसादरम्यान वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने झाडे उन्मळून पडणे, फांद्या तुटणे तसेच स्थानिक पातळीवर वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाच्या वेळी मोकळ्या परिसरात जाणे टाळावे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये,
* उत्तर महाराष्ट्र : जळगाव
* मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर
* विदर्भ : बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली
या भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी हवामानातील बदलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विजांच्या कडकडाटाच्या वेळी काळजी घ्यावे.
वादळी पावसाच्या काळात विजांचा धोका सर्वाधिक असल्याने नागरिकांनी झाडाखाली, विजेचे खांब किंवा उघड्या मैदानात थांबू नये. शेतकऱ्यांनीही पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असताना शेतीची कामे थांबवून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. वादळी वाऱ्याच्या वेळी कच्च्या बांधकामांजवळ किंवा धोकादायक फलकांच्या परिसरात जाणे टाळावे.
दरम्यान, नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राकडून हवामानाचे दैनंदिन अहवाल, रडार-सॅटेलाइट माहिती आणि स्थानिक हवामान इशारे उपलब्ध करून दिले जात आहेत.
विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
विदर्भातील अमरावती, गोंदिया, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या भागांत ढगांची स्थिती बदलत राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अल्प कालावधीत जोरदार सरी कोसळू शकतात. त्यामुळे ‘वादळी पाऊस आला की लगेच सुरक्षित ठिकाणी जा’, असा सावधगिरीचा संदेश नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुढील काही तासांतील स्थानिक परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत हवामान अपडेट आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
