जेएनएन, नागपूर: कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासाला निघालेले महाराष्ट्रातील 37 भाविक तिबेटमधील सागा येथे अडकले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर या सर्व भाविकांचा सागा ते काठमांडू असा सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजता हे भाविक सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे रवाना झाले.
ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे 37 भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. यात्रा पूर्ण केल्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान ते सागा येथे अडकले. दरम्यान, त्यांचे काठमांडूहून परतीचे विमान 29 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता नियोजित आहे. त्यामुळे वेळेत काठमांडू गाठणे आवश्यक होते.
भाविक सागा येथे अडकल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यानंतर आवश्यक ते सहकार्य आणि समन्वय करण्यात आला. प्रशासनाच्या प्रयत्नांनंतर सर्व 37 भाविकांचा काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू झाला आहे.
संकटाच्या परिस्थितीत तातडीने मदत आणि सहकार्य मिळाल्याबद्दल भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार तसेच भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार मानले आहेत.
नागपूरचे 110 नागरिकही नेपाळमध्ये सुरक्षित
दरम्यान, नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील 110 नागरिक सुरक्षित असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. श्री स्वामी महाराज यांच्या समूहासोबत हे नागरिक 22 ऑगस्ट 2026 रोजी काठमांडू येथे पर्यटन आणि धार्मिक भेटीसाठी गेले होते. या समूहात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी झालेल्या महापुराचा या समूहातील नागरिकांवर कोणताही परिणाम झालेला नाही. सध्या हे सर्व नागरिक काठमांडू येथील माहेश्वरी समाज येथे सुरक्षितपणे वास्तव्यास आहेत. नागपूर जिल्हा प्रशासन त्यांच्याशी सातत्याने संपर्कात असून, नेपाळ प्रशासनाकडूनही आवश्यक मदत आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जात आहे.
पर्यायी बसची व्यवस्था
नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी नियोजित बसऐवजी नेपाळ प्रशासनाच्या सहकार्याने पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार हे नागरिक 27 ऑगस्ट रोजी काठमांडूहून जनकपूर आणि त्यानंतर नेपाळ-भारत सीमेच्या दिशेने रवाना झाले आहेत. 28 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत जनकपूर येथे पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले होते.
जनकपूर येथून भारतात प्रवेश केल्यानंतर हे नागरिक पटना येथे जाणार असून, तेथून 28 ऑगस्ट रोजी दानापूर रेल्वे स्थानकावरून नागपूरकडे येण्यासाठी त्यांची रेल्वेगाडी नियोजित आहे. त्यानुसार सर्व नागरिकांना सुरक्षितपणे नागपूर येथे परत आणण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
नागपूर जिल्हा प्रशासनाचा या नागरिकांच्या नातेवाईकांशीही संपर्क आहे. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार समूहातील सर्व नागरिक सुरक्षित आहेत. त्यांच्या परतीच्या प्रवासावर प्रशासनाकडून देखरेख ठेवण्यात येत असून, आवश्यक त्या ठिकाणी समन्वय साधला जात आहे.
