नवी मुंबई. Navi Mumbai Airport: मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) हवाई वाहतुकीचे चित्र बदलण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) अल्पावधीतच मोठी झेप घेतली आहे. 25 डिसेंबर 2025 रोजी व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या आठ महिने आठ दिवसांत म्हणजे 1 सप्टेंबर 2026 रोजी विमानतळाने 30 लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे. या कालावधीत विमानतळावरून सुमारे 22 हजार 500 व्यावसायिक विमानफेऱ्या हाताळण्यात आले आहेत.

13 शहरांपासून 46 गंतव्यांपर्यंत विस्तार

नवी मुंबई विमानतळावर व्यावसायिक सेवा सुरू झाली, त्यावेळी विमानतळाची हवाई जोडणी केवळ 13 गंतव्यांपुरती मर्यादित होती. मात्र प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि विमान कंपन्यांकडून वाढणाऱ्या सेवांमुळे या नेटवर्कचा मोठ्या वेगाने विस्तार झाला. आता नवी मुंबई विमानतळाची जोडणी 46 गंतव्यांपर्यंत पोहोचली आहे. 

यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना देशातील विविध भागांमध्ये जाण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढता प्रवासी भार लक्षात घेता नवी मुंबई विमानतळाची भूमिका आगामी काळात आणखी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

22,500 हून अधिक विमानफेऱ्या

विमानतळ सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 22,500 व्यावसायिक विमानफेऱ्या हाताळण्यात आले आहेत.अवघ्या काही महिन्यांत विमानतळाने प्रवासी वाहतुकीसोबतच विमानांच्या वाढत्या हालचालींचे व्यवस्थापन करण्याची क्षमता दाखवून दिली आहे. 

    या काळात विमानतळाच्या कार्यक्षमतेचा आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा कस लागला आहे. विशेषतः सामान हाताळणीच्या बाबतीत ऑगस्ट महिन्यात विमानतळाची कामगिरी उल्लेखनीय राहिली. 94 टक्के प्रवाशांना त्यांचे शेवटचे चेक-इन केलेले सामान 30 मिनिटांच्या आत मिळाले, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे. 

    200 दिवसांतच आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरुवात

    नवी मुंबई विमानतळाची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे देशांतर्गत सेवांनंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवाही अपेक्षेपेक्षा वेगाने सुरू झाली. विमानतळ सुरू झाल्यानंतर 200 दिवसांपेक्षा कमी कालावधीत नियोजित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली आणि नवी मुंबईला पहिले आंतरराष्ट्रीय कनेक्शन अबुधाबीशी मिळाले. 

    यामुळे नवी मुंबई विमानतळ केवळ देशांतर्गत प्रवासासाठीचे केंद्र न राहता आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचे महत्त्वाचे प्रवेशद्वार बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे.

    सहा नव्या शहरांसाठीही कनेक्टिव्हिटी-

    विमानतळाच्या नेटवर्कमध्ये आणखी विस्तार होणार आहे. उदयपूर, जोधपूर, रांची, दरभंगा, गुवाहाटी आणि सिंधुदुर्ग या सहा नव्या देशांतर्गत गंतव्य स्थानांचा समावेश होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावरून उपलब्ध होणाऱ्या प्रवासाच्या पर्यायांमध्ये आणखी वाढ होणार आहे.