मुंबई. MumBai Metro: मुंबईकरांच्या प्रवासाचा कणा मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेला आता मेट्रोची वाढती कनेक्टिव्हिटी पर्याय ठरू लागली आहे. मुंबईत विविध मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय प्रवासी संख्येवर होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. आर्थिक वर्ष 2026-27च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून 2026 या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय प्रवासी संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत 44.65 लाखांची घट झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने केलेल्या अंतर्गत विश्लेषणात मेट्रोच्या वाढत्या स्पर्धेकडे या घटीमागील संभाव्य कारण म्हणून पाहण्यात आले आहे.
लोकल प्रवासी 26.04 कोटींवरून 25.60 कोटींवर
एप्रिल ते जून 2025 या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवांनी सुमारे 26.04 कोटी प्रवासी प्रवास करत होते. याच कालावधीत 2026 मध्ये ही संख्या 25.60 कोटींवर आली. म्हणजेच वर्षभरात सुमारे 44.65 लाख प्रवाशांची घट, अर्थात 1.71 टक्के घट नोंदवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ही घट सर्वच प्रकारच्या लोकल प्रवासात सारखी नाही. सेकंड क्लास प्रवाशांची संख्या सुमारे 3 टक्क्यांनी, तर फर्स्ट क्लास प्रवाशांची संख्या 7.23 टक्क्यांनी कमी झाली. दुसरीकडे एसी लोकलच्या प्रवासी संख्येत जवळपास 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. एसी प्रवासी संख्या 1.37 कोटींवरून सुमारे 1.78 कोटींवर पोहोचली.
मेट्रोच्या वाढत्या कनेक्टिव्हिटीचा परिणाम?
पश्चिम रेल्वेच्या विश्लेषणात बोरिवली-दहिसर आणि अंधेरी परिसरातील प्रवासी संख्येतील बदलाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. या भागांमध्ये लोकलच्या समांतर किंवा जवळच्या मार्गांवर मेट्रो सेवा उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना आता पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळाली आहे.
मेट्रोच्या रेड आणि यलो मार्गिकांनी एप्रिल-जूनदरम्यान सुमारे 2.26 कोटी राइड्स नोंदवल्याचे या विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे. तर अॅक्वा लाइनवर सुमारे 1.65 कोटी राइड्स झाल्याचे सांगण्यात आले आहे. दोन्हींचा एकत्रित आकडा सुमारे 3.91 कोटी राइड्स इतका होतो. मात्र, या मेट्रोचे आकडे माध्यमांमधून घेतलेले असल्याने त्यांची पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत आकडेवारीशी थेट तुलना करून किती प्रवासी लोकलमधून मेट्रोकडे वळले हे निश्चित करता येत नाही.
अंधेरी, प्रभादेवी, महालक्ष्मीमध्ये मोठी घट-
मेट्रोचा परिणाम काही प्रमुख स्थानकांच्या आकडेवारीत अधिक स्पष्टपणे दिसून येतो. अंधेरी स्थानकावरील फर्स्ट क्लास जर्नी तिकिटांच्या विक्रीत 15.02 टक्के, तर सेकंड क्लास जर्नी तिकिटांमध्ये 6.51 टक्के घट झाली.
याशिवाय महालक्ष्मी आणि प्रभादेवी स्थानकांवरही प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाली. महालक्ष्मी येथे फर्स्ट क्लास जर्नी तिकिटांमध्ये 19.18 टक्के, तर प्रभादेवी येथे 12.26 टक्के घट नोंदवण्यात आली. सेकंड क्लास जर्नी तिकिटांच्या बाबतीत प्रभादेवीमध्ये 23.02 टक्के, तर महालक्ष्मीमध्ये 19.46 टक्के घट झाली.
मात्र एसी लोकलला पसंती वाढली
एकीकडे पारंपरिक लोकल प्रवासी कमी होत असताना एसी लोकलच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. एप्रिल-जून 2026 या तिमाहीत एसी लोकलने सुमारे 1.78 कोटी प्रवासी वाहून नेले. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ जवळपास 30 टक्के आहे.
काही स्थानकांवर ही वाढ अत्यंत मोठी आहे. लोअर परळमध्ये एसी जर्नी तिकिटांमध्ये 175 टक्के, राम मंदिरमध्ये 156 टक्के, गोरेगावमध्ये 127 टक्के आणि खार रोडवर 115 टक्के वाढ झाली. मात्र, एसी प्रवाशांची ही वाढ पूर्णपणे नवीन प्रवासी लोकलमध्ये आले आहेत असे म्हणता येणार नाही. सेकंड किंवा फर्स्ट क्लासमधील काही प्रवाशांनी एसी लोकलकडे आपला प्रवास अपग्रेड केला असण्याची शक्यता आहे.
रेल्वेसमोर नवे आव्हान; एसी लोकल वाढवण्याची तयारी-
प्रवाशांच्या बदलत्या पसंतीचा विचार करून पश्चिम रेल्वेने एसी लोकल सेवांचा विस्तार वेगाने करण्याची गरज व्यक्त केली आहे. दररोज सुमारे 45 हजार अतिरिक्त प्रवासी एसी ईएमयू सेवांकडे वळत असल्याचे विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी एसी लोकलची संख्या वाढवण्यावर भर देण्याची शक्यता आहे.
