ठाणे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाच्या जेवणात मेलेले झुरळ आढळल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र खाद्य व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने रुग्णालयाचे उपहारगृह बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
या सरकारी रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी दाखल झालेल्या एका रुग्णाने 28 ऑगस्ट रोजी तक्रार केली होती की, रात्री दिलेल्या जेवणाच्या ताटात झुरळ आढळले होते.
रुग्णालयाच्या बेजबाबदारपणाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी डीनच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते.
मोठ्या विरोध-प्रदर्शनानंतर एफडीए अधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या कॅन्टीनची पाहणी केली होती. यावेळी खाद्य सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. यामुळे कँटीन सेवा निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एफडीएने कँटीन ठेकेदार 'राम केटरर्स' विरोधातही कारवाई सुरू केली आहे.
डीन डॉ. स्वप्नाली कदम यांनी शुक्रवारी सांगितले की, जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही व एफडीएकडून पुन्हा मंजुरी मिळेपर्यंत तोपर्यंत रुग्णालयाचे कँन्टीन बंद राहील.
डॉ. कदम यांनी सांगितले की, एफडीएकडून मंजुरीशिवाय ठेकेदाराला काम सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नाही. रुग्णांच्या जेवणाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
