जेएनएन, मुंबई. मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे. दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमादरम्यान विटांचा कॉलम अचानक कोसळून त्याखाली दबल्याने 7 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत गोविंदाचा नाव रुद्र कदम (वय 7 वर्षे) असे नाव आहे.

विटांचा कॉलम अचानक कोसळला

मालाड पश्चिमेकडील चिकूवाडी, मालवणी येथील एकता वेल्फेअर सोसायटीमध्ये दहीहंडी दुर्दैवी दुर्घना आहे.  एकता वेल्फेअर सोसायटीमध्ये स्थानिक मुलांकडून दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी दहीहंडीसाठी झाडाला आणि तळमजल्यावरील विटांच्या कॉलमला दोरी बांधण्यात आली होती. दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच हा विटांचा कॉलम अचानक कोसळला.

या दुर्घटनेत कॉलमखाली दबून 7 वर्षीय रुद्र कदम गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. घटनेनंतर रुद्रला तातडीने मालवणी जनरल रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं.

पुण्यात एका महिलेचा मृत्यू

पुण्यात लोखंडी सांगाड्याखाली चिरडून एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर मुंबईत किमान 32 आणि ठाण्यात 10 'गोविंदा' दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.