डिजिटल डेस्क, मुंबई: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 21ऑगस्ट रोजी एकाच कुटुंबातील तीन जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. या घटनेमागे 18 वर्षीय कुणाल चंदगुडे याच्या आयफोनच्या EMI वरून झालेला वाद कारणीभूत असल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र, आता मृतांच्या नातेवाईकांनी हा दावा फेटाळून लावला असून, ‘आयफोनच्या EMI’ची कहाणी केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.
पोलिसांच्या तपासात या घटनेमागे कौटुंबिक मतभेद, आर्थिक अडचणी आणि कुटुंबातील जुन्या वादांची शक्यता तपासली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
‘आयफोनच्या EMIची चर्चा करू नका’, नातेवाईकांची विनंती
मृत संगीता चंदगुडे यांच्या बहिणी पल्लवी पाटील यांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या आयफोनच्या EMI संबंधी दाव्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या बहिणीचा मुलगा कुणाल आणि मेहुणे मुरलीधर यांना गमावल्यानंतर कुटुंब अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पल्लवी पाटील यांनी एका व्हिडिओ संदेशातून लोकांना अपील करताना सांगितले की, घटनेबाबत माहिती नसताना सोशल मीडियावर वेगवेगळ्या कथा पसरवू नयेत. अशा चर्चांमुळे कुटुंबाच्या दुःखात आणखी भर पडत असल्याचे त्यांनी म्हटले.
त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर या घटनेबाबत अनेक दावे केले जात आहेत; मात्र त्यामागची खरी परिस्थिती बाहेरच्या लोकांना माहिती नाही. त्यामुळे कोणतीही माहिती खात्रीशीर नसताना त्यावर भाष्य करू नये, अशी विनंती त्यांनी केली.
पती-पत्नीमधील मतभेदांचीही चौकशी
मुरलीधर चंदगुडे हे ट्रकचालक होते, तर संगीता गृहिणी होत्या. सुमारे सहा वर्षांपूर्वी या दाम्पत्याने आजारपणामुळे आपल्या मोठ्या मुलाला गमावले होते. त्यानंतर कुटुंबातील परिस्थिती बिघडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुरलीधर आणि संगीता काही काळ वेगवेगळे राहत असल्याचीही माहिती समोर आली आहे. मुरलीधर कामानिमित्त अनेक दिवस घरापासून दूर राहत होते. घटनेच्या दोन दिवस आधी ते घरी परतले होते. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिस या कौटुंबिक परिस्थितीचाही तपास करत आहेत.
संगीता यांच्या व्हिडिओमुळे तपासाला नवा धागा?
या प्रकरणाच्या तपासादरम्यान संगीता यांचा एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये त्या कुटुंबातील काही व्यक्तींवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत.
मालमत्तेशी संबंधित वाद, कुटुंबातील सदस्यांमध्ये निर्माण झालेले मतभेद आणि मुलाला पालकांपासून दूर केल्यासंदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, कुटुंबातील नात्यांमध्ये विष कालवल्याचाही त्यांनी उल्लेख केला होता.
या व्हिडिओमागील नेमकी पार्श्वभूमी काय आहे आणि त्याचा या घटनेशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.
घटनेच्या एक दिवस आधीही संगीता यांनी केला होता ‘नात्यां’वर व्हिडिओ
संगीता या सोशल मीडियावर सक्रिय होत्या. त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर २९ हजारांहून अधिक सब्सक्राइबर्स असल्याचे सांगितले जाते. त्या अनेकदा आपल्या मुलासोबत व्हिडिओ शेअर करत असत.
घटनेच्या एक दिवस आधी त्यांनी नातेसंबंध आणि त्यातील परस्पर आदर यावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. एखाद्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची आणि भावनांची किंमत नसेल, तर अशा नात्याचा पुनर्विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले होते.
नात्यांची तुलना त्यांनी भाकरीशी केली होती. दोन्ही बाजूंनी नात्याची कदर केली तरच ते टिकते, अन्यथा अशा नात्यातून बाहेर पडणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले होते.
कुणाल यापूर्वीही अशाच परिस्थितीत सापडला होता?
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, कुणाल यापूर्वीही आत्महानीचा विचार करून याच परिसरात गेला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधून त्याला सुरक्षितपणे परत आणले होते.
त्यामुळे सध्याच्या घटनेचा तपास करताना कुणालची पूर्वीची मानसिक अवस्था, कुटुंबातील परिस्थिती आणि त्याच्याशी संबंधित उपलब्ध माहिती यांचाही विचार केला जात आहे.
EMI नव्हे, नेमकं कारण काय?
सुरुवातीला आयफोनच्या EMI वरून झालेला वाद ही या घटनेमागची प्रमुख पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता कुटुंबीयांनीच हा दावा फेटाळल्याने पोलिसांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
हेही वाचा: Maharashtra Loan Waiver: शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता वितरित; 6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 5,086 कोटींचा लाभ
