छत्रपती संभाजीनगर - Wrestler Ashwini Paul Suicide: धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका राष्ट्रीय पातळीवरून महिला कुस्तीपटूने आपल्या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्याच्या बुरुजावरून उडी मारली. या घटनेत महिला व तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नळदुर्ग किल्ल्याच्या उपली बुरुजावरुन विवाहित महिलेनं तीन लहान मुलांसह जवळपास 150 फूट खोल दरीत उडी मारली. अश्विनी मनोहर पौळ (वय 30) असे मृत महिलेचे नाव आहे.
'महाराष्ट्राची वाघिणी' म्हणून ओळख -
अश्विनी मनोहर पौळ या राष्ट्रीय पातळीवरून प्रसिद्ध कुस्तीपटू होत्या. त्यांनी अनेक पदके जिंकली होती. त्यांना क्रीडा क्षेत्रात 'महाराष्ट्राची वाघिणी' म्हणून ओळखलं जात होतं. त्यांनी 2007 मध्ये तिरुवनंतपुरम येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकलं होतं. त्याचबरोबर 2008 व 2009 मध्ये पंजाबमधील गुरुदासपूर आणि चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे.
पतीच्या सांगण्यावरून सरकारी नोकरीचा राजीनामा -
मृत अश्विनी पौळ मुंबईत 'एमएसएफ'मध्ये नोकरीला होत्या. तर त्यांचे पती मनोहर रिक्षाचालक असल्याची माहिती आहे. पतीच्या सांगण्यावरुन अश्विनी यांनी चार ते पाच महिन्यांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिला होता. मागील तीन महिन्यांपासून त्या आपल्या तीन मुलांसह माहेरी राहत होत्या. अश्विनी यांचं माहेर उमरगा तालुक्यातील व्हंताळ येथे आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, व्हंताळ गावात आपल्या आई-वडिलांसोबत राहणाऱ्या अश्विनी मनोहर पौळ यांनी आपला साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य आणि अडीच वर्षांच्या जुळ्या मुली वीरा व क्रांती यांच्यासोबत नळदुर्ग किल्ल्याला भेट दिली होती.
ते चौघे किल्ल्यातील सर्वात उंच ठिकाण असलेल्या उपली बुरुजावरून पडले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
अश्विनी आणि अजिंक्य यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वीरा आणि क्रांती यांना जखमी अवस्थेत धाराशिव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान क्रांतीचाही मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
105 एकर परिसरात पसरलेल्या नळदुर्ग किल्ल्याला 100 हून अधिक बुरुज आहेत. उपली बुरुज जवळपास 80 फूट उंच आहे.
अश्विनी यापूर्वी महाराष्ट्र सुरक्षा दल या सरकारी सुरक्षा संस्थेत दाखल झाली होती, परंतु तिने ४-५ महिन्यांपूर्वी राजीनामा दिला, असे अधिकाऱ्याने सांगितले. नळदुर्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. 'अश्विनी आणि तिच्या दोन मुलांवर आज अंत्यसंस्कार केले जातील. त्यानंतर या घटनेमागील कारणाची चौकशी केली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
