जालना. Manoj jarange patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतच आंदोलन करण्यात येणार असून, सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढील आंदोलन थेट मुंबईत होईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील आंदोलनासाठी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी होणार असून, पाच टप्प्यांत तब्बल 6 कोटी मराठे मुंबईत जाणार असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्यात आली असून, त्यानंतर सरकारच्या भूमिकेनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असेही संकेत त्यांनी दिले आहेत.
सरकारने निर्णय न घेतल्यास मुंबईकडे मोर्चा
मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन मुंबईकडे वळेल, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. मुंबईत मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्यात येईल आणि त्यासाठी राज्यभरातून मराठा समाजबांधव सहभागी होतील, असे त्यांनी म्हटले.29 ऑगस्टला अंतरवालीमध्येच आंदोलन होणार आहे. आरक्षण दिले नाही तर पुढील आंदोलन मुंबईत होणार आहे. पाच टप्प्यांत सहा कोटी मराठे मुंबईत जाणार आहे अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
अंतरवालीत आंदोलनाची जोरदार तयारी
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे मराठा समाजबांधवांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांतून आंदोलक येथे येणार असल्याने प्रशासनावरही मोठा ताण येऊ शकतो. आंदोलन शांततेत पार पडावे, यासाठी प्रशासनाकडूनही नियोजन करण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. 29 ऑगस्टच्या आंदोलनानंतर सरकारकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि जरांगे पाटील मुंबई आंदोलनाबाबत अंतिम निर्णय कधी जाहीर करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
