छत्रपती संभाजीनगर. Chhatrapati sambhajinagar Hospital fire: छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील एशियन रुग्णालयातील बाल अतिदक्षता विभागाला (पीआयसीयू) शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. वेळीच राबविलेल्या बचावकार्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे रौद्ररुप पाहून रुग्णालयात एकच खळबळ उडाली. या वेळी विभागात 9 शिशूंवर उपचार सुरू होते. विशेष म्हणजे आग लागलेल्या मजल्यावर बालकांसह एकूण 58 रुग्णांवर उपचार सुरू होते. प्रसंगावधान राखत रुग्णालय प्रशासन, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सर्व शिशूंना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना घाटी रुग्णालयासह शहरातील अन्य खासगी रुग्णालयांत तातडीने हलविण्यात आले.
शहरातील आकाशवाणी चौकातील एशियन हॉस्पिटलमध्ये रात्री अडीच ते पावणे तीनच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. बाल अतिदक्षता विभागात म्हणजेच NICU मध्ये आग लागल्याने एकच खळबळ उडाली. एसीच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, 4 सप्टेंबर रोजी पहाटे पावणे तीनच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये आगीचा प्रकार घडला. NICUसारख्या अत्यंत संवेदनशील विभागात आग लागल्याने रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली.
आगीची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. NICUमध्ये उपचार घेत असलेल्या 9 चिमुकल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हे बचाव पथकांसमोर सर्वात मोठे आव्हान होते. त्याचबरोबर हॉस्पिटलमधील इतर रुग्णांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार 58 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.
एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
दरम्यान, एसीमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आगीचे नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. आग नेमकी कुठून सुरू झाली, किती भागाचे नुकसान झाले आणि हॉस्पिटलच्या अग्निसुरक्षा यंत्रणेने कशी कामगिरी केली, याबाबतची माहिती तपासानंतर समोर येण्याची शक्यता आहे.
58 रुग्णांची मृत्यूच्या दाढेतून सूटका -
NICUमध्ये नवजात बालकांवर उपचार सुरू असताना आग लागल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. मात्र वेळीच बचावकार्य सुरू झाल्याने 9 चिमुकल्यांसह 58 रुग्णांचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर हॉस्पिटलच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून मोठा अनर्थ टाळला. सर्व 9 बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यानं सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.आगीची सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या अन् अवघ्या 10 ते 15 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. बचावकार्यादरम्यान अनेक रुग्णवाहिकांमधून शिंशून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत होते. घटनास्थली बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थांनी पाहणी केली जात असून आगीच्या कारणांचाही शोध घेतला जात आहे.
