जेएनएन, मुंबई: रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे नाते अधिक घट्ट करणारा सण म्हणून देशभरात उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. त्यानंतर मिठाई भरवून हा आनंदाचा क्षण आणखी गोड केला जातो. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी मिठाईला विशेष महत्त्व असते.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारातून मिठाई खरेदी करण्याऐवजी यंदा तुम्ही घरच्या घरीच स्वादिष्ट ओल्या नारळाची बर्फी तयार करू शकता. नारळाची बर्फी बनवणे सोपे असून, कमी साहित्यामध्ये ही मिठाई तयार करता येते. बदाम आणि ओल्या नारळामुळे बर्फीची चव आणखी खास होते.
ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी साहित्य
- 2 ओले नारळ
- अर्धा पाव साखर
- 2 चमचे तूप
- 1 कप बदाम
- 1कप दूध
- वेलची पावडर
बर्फी बनवण्याची कृती
- सर्वप्रथम ओले नारळ फोडून त्यातील खोबरे काढून घ्या. खोबरे आणि बदाम पाण्यात उकळून घ्या. त्यानंतर खोबऱ्यावरील काळसर साल काढून खोबऱ्याचे छोटे तुकडे करा. हे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बदामाची साल काढून त्याचीही बारीक चुरा करून घ्या.
- यानंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करा. त्यात बारीक केलेले खोबरे आणि बदाम घालून चांगले परतून घ्या. मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर त्यात साखर आणि दूध घाला. हे मिश्रण मंद आचेवर सतत ढवळत शिजवा.
- मिश्रण घट्ट होऊन पॅनच्या कडा सोडू लागल्यावर त्यात वेलची पावडर घाला. सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करा.
- दरम्यान, एका ताटाला किंवा ट्रेला थोडे तूप लावून घ्या. यामुळे बर्फी ताटाला चिकटणार नाही. तयार झालेले मिश्रण तुप लावलेल्या ताटात ओतून समान पसरवून घ्या.
- मिश्रण काही वेळ थंड होऊ द्या. ते पूर्णपणे घट्ट होण्यापूर्वी सुरीने चौकोनी किंवा आयताकृती काप करून घ्या. बर्फी पूर्णपणे थंड झाल्यानंतर काप अलगद ताटातून काढा.
अशा प्रकारे तयार झाली रक्षाबंधनासाठी खास ओल्या नारळाची स्वादिष्ट बर्फी. घरच्या घरी तयार केलेली ही मिठाई राखीच्या सणाचा आनंद आणखी गोड करण्यासाठी नक्कीच खास ठरू शकते.
हेही वाचा: Shravan 2026: उपवासदरम्यान तुम्हाला चटपटीत आणि स्वादिष्ट पदार्थ खायचे आहे का? या सोप्या पद्धतीने झटपट बनवा 'आलू भुजिया'
