जेएनएन, मुंबई. National Handloom Day 2026: भारतातील हातमाग (Handloom) उद्योग हा देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्राच्या या परंपरेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या पैठणी साडीचे स्थान विशेष आहे. राष्ट्रीय हँडलूम दिनानिमित्त (National Handloom Day 2026) महाराष्ट्राच्या पारंपरिक कलेचे प्रतीक असलेल्या पैठणीचा इतिहास, तिची वैशिष्ट्ये आणि आजही टिकून असलेले महत्त्व जाणून घेणे आवश्यक ठरते.

सातवाहन काळापासूनची समृद्ध परंपरा
पैठणी साडीचे नाव औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या प्राचीन पैठण शहरावरून पडले आहे. सातवाहन साम्राज्याची राजधानी असलेल्या या शहरात शेकडो वर्षांपूर्वीपासून उत्कृष्ट रेशीम आणि जरीच्या साड्या विणल्या जात होत्या. राजघराणे, सरदार आणि श्रीमंत घराण्यांमध्ये पैठणीला मानाचे स्थान होते. आजच्या बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात ही  हातमागावर विणली जाणारी पैठणी आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक मानली जाते.

पैठणीची खास ओळख
पैठणीची सर्वात मोठी ओळख म्हणजे तिचा देखणा पदर, रुंद जरीची किनार आणि आकर्षक नक्षीकाम. पदरावर मोर, तोता-मैना, पोपट, कमळ, फुलांच्या वेली आणि विविध पारंपरिक आकृत्या विणलेल्या असतात. तर साडीवर कोयरी, आंबा, अश्रफी, अमरवेल, नारळ, पारवा आणि बांगडीतील मोर यांसारख्या नक्षी पाहायला मिळतात.

या साडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा 'धूप-छाव' रंग परिणाम. यासाठी उभ्या आणि आडव्या धाग्यांमध्ये वेगवेगळ्या रंगांचा वापर केला जातो. त्यामुळे प्रकाशानुसार साडीचा रंग बदलल्यासारखा भास होतो.

 2009 मध्ये पैठणी साडीला Geographical Indication (GI) Tag देण्यात आला. यामागचा उद्देश केवळ तिला एक विशेष ओळख मिळवून देणं नव्हता, तर शतकानुशतकांची ही परंपरा बनावट उत्पादनांपासून जपणं आणि अस्सल विणकरांच्या मेहनतीला योग्य मान्यता मिळवून देणं हा होता.

पैठणीचे विविध प्रकार
नक्षी आणि विणकामानुसार पैठणीचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये मोरबांगडी, मुनिया (पोपट) ब्रोकेड, कमळ ब्रोकेड आणि पारंपरिक पैठणीचा समावेश होतो.

    मोरबांगडी पैठणीमध्ये बांगडीच्या आकारात मोराची नक्षी विणली जाते, तर मुनिया ब्रोकेडमध्ये हिरव्या रंगाचे पोपट ही खास ओळख असते. कमळ ब्रोकेडमध्ये पदरावर बहुरंगी कमळाची आकर्षक रचना विणली जाते.

    विणकामाच्या पद्धतीनुसार कडियाल बॉर्डर आणि कड (एकधोटी) हे प्रकार प्रसिद्ध आहेत. तसेच रंगांच्या आधारे काळीचंद्रकला, रघू (पोपट हिरवा) आणि शिरोडक (शुद्ध पांढरी) या पारंपरिक पैठण्या विशेष लोकप्रिय आहेत.

    येवल्याची पैठणी जगभर प्रसिद्ध
    आज नाशिक जिल्ह्यातील येवला हे पैठणी विणकामाचे सर्वात मोठे केंद्र म्हणून ओळखले जाते. येथील कुशल विणकरांनी पारंपरिक कला जपत आधुनिक बाजारपेठेत पैठणीला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे आणि प्रोत्साहनामुळे येवल्यातील हातमाग उद्योगाला चालना मिळाली असून येथून तयार होणाऱ्या पैठण्यांची देशासह परदेशातही मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.

    ओरिजिनल पैठणी कशी ओळखावी 

    • तुम्हाला अस्सल पैठणी ओळखायची असेल, तर या काही गोष्टी लक्षात ठेवाः
    • साडीच्या दोन्ही बाजूंवरील नक्षी सारखीच दिसते.
    • बांगडी मोर, आसावली यांसारखी पारंपरिक नक्षी आढळते.
    • हाताने विणलेली असल्यामुळे त्यात किरकोळ नैसर्गिक असमानता दिसू शकते आणि हाच तिच्या अस्सलपणाचा पुरावा असतो.

    राष्ट्रीय हँडलूम दिनाचे महत्त्व
    दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हँडलूम दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश देशातील हातमाग उद्योग, विणकर आणि कारागिरांच्या योगदानाचा सन्मान करणे तसेच भारतीय हस्तकलेला प्रोत्साहन देणे हा आहे. पैठणीसारख्या पारंपरिक हातमाग उत्पादनांची खरेदी केल्यास स्थानिक विणकरांना रोजगार मिळतो आणि भारताची समृद्ध वस्त्रपरंपरा जपण्यासही हातभार लागतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची ओळख असलेली पैठणी ही केवळ एक साडी नसून, अनेक पिढ्यांच्या कौशल्याचा, कलेचा आणि परंपरेचा अमूल्य ठेवा आहे. आधुनिक फॅशनच्या युगातही तिचे सौंदर्य, दर्जा आणि ऐतिहासिक महत्त्व कायम असून देश-विदेशातील ग्राहकांमध्ये तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

    हेही वाचा: National Handloom Day 2026: 'हँडलूमचा प्रचार सोशल मीडियावर करा'; पीएम मोदींचे देशवासीयांना आवाहन