काठमांडू: Nepal Flood Disaster: नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत, आतापर्यंत 175 लोकांचे मृतदेह हाती लागले असून संपूर्ण गावेच्या गावे वाहून गेली आहेत. बचाव पथके बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, नेपाळच्या तीन जिल्ह्यांमधून वाहणाऱ्या भोटे कोशी नदीला अचानक महापूर आला. घटना नेमकी कशी घडली हे अजून स्पष्ट झाले नसले तरी, ग्लेशियर कोसळल्यामुळे भोटे कोशीची उपनदी असलेल्या ल्हेन्डे नदीचा प्रवाह अडवला गेला व अचानक महापूर आला, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे पाण्याची पातळी अचानक वाढली आणि पुराचे पाणी सर्वात आधी तिबेटच्या सीमेवर असलेल्या रसुवागढीजवळील तिमुरे भागात धडकले.
मदत आणि बचाव कार्यात अडचणी-
काही मिनिटांतच पुराचे पाणी वेगाने खाली वाहात आले आणि नेपाळच्या रसुवा, नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांतील अनेक वस्त्या वाहून गेल्या. घरे, रस्ते, पूल आणि सार्वजनिक ठिकाणी कित्येक मीटर गाळ जमा झाला असून, यामुळे शोध आणि बचाव कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या भागातील व्हिडिओंमध्ये घरांचा किमान एक मजला गाळाने झाकला गेल्याचे दिसत आहे. नुवाकोटच्या त्रिशूली बाजारात कपड्यांचे दुकान चालवणाऱ्या एका स्थानिक व्यापाऱ्याने सांगितले की, पूर इतक्या वेगाने आला की लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी अजिबात वेळ मिळाला नाही.
'काही सेकंदांतच आला महापूर'
या आपत्तीतून सुखरुप वाचलेल्या एका व्यक्तीने सांगितले, सकाळी प्रशासनाचे लोक आले आणि त्यांनी आम्हाला तिबेटच्या बाजूला भोटे कोशी नदीवर बांधलेले धरण फुटले असून मोठ्या प्रमाणावर पाणी आमच्या दिशेने येत असल्याचे सांगितले. आम्हाला उंचावरील भागाकडे धावण्यास सांगण्यात आले. त्यांनी पुढे सांगितले की, खूप कमी लोक वेळेवर सुरक्षित स्थळी पोहोचू शकले, कारण काही सेकंदांतच पुराच्या पाण्याने अनेक लोकांना वाहून नेले.
त्यांचा 18 वर्षांचा मुलगा आणि पत्नीही बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. पुराबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली नाही
प्रत्यक्षदर्शींच्या मते, हा पूर कोणतीही पूर्वकल्पना न देता आला. त्यादिवशी परिसरात पावसाची कोणतीही नोंद नव्हती आणि लोक रोजच्या कामात व्यस्त होते, तितक्यात अचानक पाण्याच्या प्रचंड लाटेने संपूर्ण भागाला विळखा घातला.
जमीन हादरली अन् धुराचे लोट दिसले
रसुवा येथील कस्टम्सचे मुख्य अधिकारी राजेंद्र ढुंगाना यांनी काठमांडू पोस्टला सांगितले की, त्यांना जमीन हादरल्याचा भास झाला आणि ते बाहेर धावले. तिथे त्यांनी पाहिले की वरच्या बाजूने पाण्याची एक प्रचंड लाट, ज्याच्या मागे धुरासारखा लोट दिसत होता, ती तिमुरे बाजाराच्या दिशेने वेगाने येत होती. आपत्तीचे भीषण स्वरूप स्पष्ट होताच ढुंगाना आणि इतर अनेक लोकांनी जवळच्या जंगलात धाव घेतली. कस्टम चेकपॉईंटवर वाट पाहणारी 300 हून अधिक वाहने आणि ट्रक वाहून गेले. नेपाळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या भीषण आपत्तीत किमान 175 जणांचा मृत्यू झाला असून, विनाशकारी पुरानंतर 823 लोकांशी संपर्क होऊ शकलेला नाही.
