काठमांडू: तिबेट सीमेच्या बाजूला असलेले आणखी एक धरण फुटले आहे. या घटनेनंतर नदी खोऱ्यातील सखल भागात पुराचा गंभीर धोका निर्माण झाला असून, नेपाळ पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ प्रभावाने हाय अलर्ट जारी केला आहे. तिबेटच्या क्षेत्रात आणखी एक तलाव फुटल्याची माहिती मिळताच नेपाळ पोलिसांनी आपत्कालीन इशारा (इमरजन्सी अलर्ट) जारी केला आहे. पोलिसांनी तात्काळ नोटीस जारी करून बचाव आणि मदत कार्यात गुंतलेल्या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना आणि सामान्य जनतेला त्वरित सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.  प्रशासनाने लोकांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी जाण्याचे आणि इतरांनाही या धोक्याबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

हे धरण 72 तासांत फुटणार असल्याचा इशारा चीनने दिला होता. हे धरण गेल्या दोन दिवसांपासून तुंबलेले होते. पाणी प्रचंड वेगाने नेपाळमधील त्रिशुली नदीच्या पाणलोट क्षेत्रात पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 रसुवाच्या सीडीओंकडून पुष्टी

'ऑनलाइन खबर' या मीडिया पोर्टलनुसार, रसुवा जिल्ह्याचे मुख्य जिल्हा अधिकारी (CDO) नरेंद्र परियार यांनीही या घटनेला अधिकृत दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, तलाव फुटल्याची ही माहिती थेट चिनी अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे.  सीडीओ परियार यांनी सांगितले, "आम्हाला चीनकडून माहिती मिळाली आहे की धरण फुटले आहे. नदीकाठी राहणाऱ्या सर्व रहिवाशांना सुरक्षित राहण्यासाठी आधीच परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

कुठे घडली दुर्घटना?

हा प्रचंड तलाव चीनमधील चोचेन खोला आणि पुरेपु त्सांगपो नद्यांच्या संगमाजवळ तयार झाला होता. माहितीनुसार, चोचेन खोला आणि पुरेपु या त्रिशूली नदी प्रणालीच्या वरच्या उपनद्या म्हणून ओळखल्या जातात. तलाव फुटल्यामुळे या नद्यांचे पाणी वेगाने त्रिशूली नदीत येत आहे, ज्यामुळे नदीची पातळी अचानक वाढण्याची आणि आसपासच्या किनारी भागात मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे त्रिशूली नदीच्या काठावर वसलेली सर्व गावे आणि वस्त्या रिकाम्या करण्याचा आणि सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.