तेहरान. US missile strike Iran: इराणच्या दक्षिणेकडील होर्मोझगान प्रांतात एका विवाह सोहळ्यावर अमेरिकेने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात चार जण ठार झाले असून 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती इराणी रेड क्रेसेंटने मंगळवारी दिली.

रेड क्रेसेंटच्या माहितीनुसार, सिरिक काउंटीमधील कुहेस्ताक शहरात एका निवासी घरावर अमेरिकेचे क्षेपणास्त्र डागल्यानंतर शेलचे तुकडे पडले, जिथे एक लग्नसमारंभ सुरू होता. यात एका लहान मुलासह चार जण ठार झाले आणि 50 हून अधिक जण जखमी झाले.

तत्पूर्वी, होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ असलेल्या होर्मोझगान प्रांताचे उपराज्यपाल अहमद नफिसी यांनी सरकारी टीव्हीवर दोन मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची माहिती दिली.

दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकी सैन्याने 1 सप्टेंबर रोजी इराणच्या लष्करी तळांवर हल्ल्यांची मालिका यशस्वीरित्या पूर्ण केली.

सेंटकॉमच्या म्हणण्यानुसार, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या (आयआरजीसी) हवाई संरक्षण स्थळे, रडार प्रणाली, सागरी मालमत्ता, सुरुंग पेरण्याची क्षमता आणि दळणवळण केंद्रांना लक्ष्य करण्यात आले होते.

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये आयआरजीसीने व्यापारी जहाजे आणि अमेरिकी सैनिकांवर केलेल्या हल्ल्यांच्या वृत्तांनंतर हे हल्ले झाले आहेत. सेंटकॉमने सांगितले की, मध्य पूर्वेत 50,000 हून अधिक अमेरिकी सैनिक तैनात असून त्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

    इराणचे अमेरिकेला प्रत्युत्तर -

    इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) जॉर्डनमधील अमेरिकेच्या प्रिन्स हसन हवाई तळावर झालेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, हा हल्ला अमेरिकेच्या तळांविरुद्धच्या "निर्णायक मोहिमेचा" भाग असल्याचा दावा केला आहे.

    इराणच्या सरकारी वाहिनी IRIB ने प्रसारित केलेल्या एका निवेदनात, IRGC ने म्हटले आहे की त्यांनी प्रिन्स हसन हवाई तळावर लांब पल्ल्याचे RQ-4 आणि MQ-9 ड्रोन ठेवलेल्या हँगरला लक्ष्य करून "जड" बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला.

    आयआरजीसीच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात अनेक ड्रोन नष्ट झाले असून अनेक अमेरिकन हवाई आणि तांत्रिक कर्मचारी ठार झाले आणि तळावरील तांत्रिक पायाभूत सुविधांच्या काही भागांना आग लागली.

    बंदर अब्बास आणि चाबहार बंदरांवर स्फोट -

    पश्चिम आशियामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पुन्हा भडकले आहे. सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणी तळांवर हल्ला केला. इराणच्या केशम बेटावर, बंदर अब्बास या बंदर शहरात आणि होर्मुझच्या उत्तर भागातील चाबहार बंदरात स्फोट झाले. दरम्यान, इराणच्या सिरिक शहराजवळ झालेल्या अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात एका विवाह सोहळ्यात चार जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले.