काठमांडू: नेपाळमधील जलप्रलयामुळे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी अचानक आलेल्या भयानक पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागातील एका शाळेतील मुले लंच ब्रेकवर असताना सुदैवाने बचावली.
धाडिंगमधील शाळेत दुसऱ्या वर्गातील मुलेही सुखरूप वाचली, कारण पाणी आत शिरण्यापूर्वीच शिक्षकांनी त्यांना त्वरीत वर्गाबाहेर पडण्यास सांगितले होते. शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या आईने सांगितले, "शिक्षकांनी सांगितले की पूर आला आहे आणि तुम्ही तुमचे बॅग व टिफिन तिथेच सोडून पळा; अशा प्रकारे ती मुले वाचू शकली." बहुतेक सर्व मुले या पुरामधून सुखरूप बाहेर पडल्याचे पालकांनी सांगितले.

शाळा चिखलाने भरली
शाळेतील बाकडे, भिंती आणि वह्यांवर गडद तपकिरी अन् राखाडी रंगाच्या चिखलाचा थर साचला होता, तर शाळेचे क्रीडांगण चिखल व गाळाने भरून गेले होते. पाणी किती वेगाने आणि किती उंचापर्यंत चढले होते, हे भिंतींवर पडलेल्या खुणांवरून स्पष्ट दिसत होते. बाकड्यांवर आणि जमिनीवर चिखलाने माखलेल्या लहान-लहान बॅगांचा ढीग पडला होता.
एका विद्यार्थ्याच्या आईला तिच्या मुलाची बॅग सापडली नाही, पण आपला मुलगा सुरक्षित असल्याचा आनंद तिला आहे. त्या म्हणाल्या, "माझा मुलगा जिवंत आहे, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे."
बुधवारी सकाळी त्रिशुली बाजारापासून काही किलोमीटर अंतरावर, नदीच्या पलीकडे बेत्रावती येथील उत्तरगया पब्लिक स्कूलजवळून पळताना एका अज्ञात व्यक्तीने ओरडून सांगितले होते—'पूर येत आहे, पळा...!'

370 हून अधिक विद्यार्थी अन् शिक्षकांचे वाचले प्राण
त्या अज्ञात व्यक्तीच्या या शब्दांमुळे शाळेत उपस्थित असलेल्या 370 हून अधिक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना वेळेवर पूर्वकल्पना मिळाली. पाण्याचा जोरदार प्रवाह रस्ते आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करत असल्याने, काही मिनिटांतच मुलांनी कॅम्पसच्या मागील बाजूस असलेल्या जंगलाच्या टेकडीकडे धाव घेतली.
बुधवारी पूर येण्यापूर्वी शाळेचे नित्यक्रम नुकतेच सुरू झाले होते. वसतिगृहातील (हॉस्टेल) मुले नाश्ता करत असतानाच कॅम्पसमध्ये हा आवाज घुमला. मुलांनी पळ काढण्यापूर्वी कोणताही सायरन, स्वयंचलित संदेश (ऑटोमेटेड मेसेज) किंवा अधिकृत इशारा मिळालेला नव्हता. उत्तरगया शाळेपर्यंत पोहोचलेली ही माहिती कॅम्पसबाहेर उपस्थित असलेल्या एका अज्ञात व्यक्तीकडूनच मिळाली होती.
मुलांच्या शिक्षणावर संकट
'सेव्ह द चिल्ड्रन्स' या संस्थेच्या माहितीनुसार, नेपाळमधील पूरग्रस्त जिल्ह्यांमधील किमान 69 शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत किंवा त्यांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे सुमारे 19,000 मुलांच्या शिक्षणावर संकट आले आहे. बचाव पथके इतर भागात पोहोचतील तशी ही आकडेवारी वाढण्याची शक्यता संस्थेने व्यक्त केली आहे.
शाळा बंद करण्याचे आदेश
देशातील अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनानंतर सरकारने शाळा व विद्यापीठे तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विद्यापीठांच्या परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत. नागरिकांना अजूनही पुराच्या इशाऱ्यांचे संदेश मिळत असून सुरक्षित व उंच ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे शाळांमधील वर्ग पुन्हा कधी सुरू होतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन एजन्सीने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 788 वर पोहोचली असून 2,502 लोक अद्याप बेपत्ता आहेत. तर चीनच्या सीमेवरील भागात 16 जणांचा मृत्यू झाला असून 546 लोक बेपत्ता असल्याचे चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. रविवारी चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तिबेटमध्ये 100 हून अधिक नेपाळी आणि इतर देशांतील नागरिकांसह 261 परदेशी नागरिक बेपत्ता आहेत.
