जेएनएन, नागपूर : मराठी चित्रपटप्रेमींसाठी सप्टेंबर 2026 हा महिना मनोरंजनाने भरलेला ठरणार आहे. विविध विषय, वेगवेगळ्या धाटणीची कथानके आणि दमदार कलाकारांची फळी असलेले अनेक मराठी चित्रपट या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विनोदी, कौटुंबिक, सामाजिक तसेच संघर्षमय कथानकांचा अनुभव प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे.
महिन्यात 'पाच फुटाचा बच्चन', 'आली मोठी शहाणी', 'मांजर', 'द्विधा', 'जयंती २' आणि 'बंडखोर' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे मराठी प्रेक्षकांसमोर मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.
'द्विधा'
सप्टेंबरच्या सुरुवातीलाच 'द्विधा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ४ सप्टेंबर २०२६ पासून हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. निके दिग्दर्शित या चित्रपटात सतीश पुळेकर, मानसी कुलकर्णी, रेणुका दफ्तदारदार, निमिष कुलकर्णी, तन्वी, आस्ताद काळे, भूषण कडू, पुष्कर शिरोडकर यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत.
'मांजर'
'मांजर' या चित्रपटाचे शीर्षक आणि त्याची मांडणी यामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. सुशील महादेव दिग्दर्शित हा चित्रपट १८ सप्टेंबर २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत, भाग्यश्री लिमये, सयाजी शिंदे, अश्विनी काळसेकर आणि अंशुमन विचारे यांसारखे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.
'जयंती २'
चित्रपटसृष्टीत चर्चेत राहिलेल्या 'जयंती' या चित्रपटाचा पुढील भाग म्हणजे 'जयंती २'. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता दुसऱ्या भागात नेमकी कोणती कथा मांडली जाणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. शैलेश बळीराम नरवाडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऋतुराज वानखेडे, शिनी दा प्रिया, पायल, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तदार आणि विजय निकम यांसह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
'बंडखोर'
'बंडखोर' हा चित्रपट २४ सप्टेंबर २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाच्या नावावरूनच बंडखोरी आणि संघर्षाची पार्श्वभूमी असल्याचे संकेत मिळतात. मृणाल, छाया कदम, शिनी दा प्रिया, पूजा काटुर्डे, तितिक्षा तावडे, नित्यश्री, संकेत ठेपाठक, मंगेश देसाई, अंगद म्हसकर, सिद्धार्थ बोडके आणि महेश मांजरेकर यांच्या भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
मराठी सिनेरसिकांसाठी मनोरंजनाची पर्वणी
महिनाभर मराठी चित्रपटगृहांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. एकाच महिन्यात विविध शैलीतील चित्रपट प्रदर्शित होत असल्याने मराठी सिनेरसिकांसाठी सप्टेंबर २०२६ हा मनोरंजनाची पर्वणी ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: महेश मांजरेकर यांच्या 'बंडखोर' चा टिझर रिलीज, छाया कदम, मृणाल कुलकर्णीसह या टीव्ही अभिनेत्रीची महत्वाची भूमिका
