जेएनएन, नागपूर: परिस्थितीसमोर शरण न जाता स्वतःच्या अस्तित्वासाठी आवाज उठवणाऱ्या सहा महिलांची कथा सांगणाऱ्या ‘बंडखोर’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाने टीझरच्या माध्यमातून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. हा चित्रपट 24 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
‘बंडखोर’च्या टीझरमध्ये सहा महिला एकत्र आलेल्या पाहायला मिळतात. त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं आहे, त्या कोणत्या परिस्थितीविरोधात उभ्या ठाकल्या आहेत आणि त्यांच्या बंडखोरीमागचं कारण काय आहे, याची उत्सुकता टीझरमुळे निर्माण झाली आहे. स्त्रीने प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घ्यावे किंवा तडजोड करावी, या पारंपरिक चौकटीला छेद देणाऱ्या महिलांची कथा या चित्रपटातून मांडली जाणार असल्याचे टीझरवरून दिसते.
सहा अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘बंडखोर’मध्ये छाया कदम, प्रियदर्शनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, पूजा कातुर्डे, तितिक्षा तावडे आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. टीझरमध्ये या सहा महिलांच्या संघर्षाची आणि त्यांच्या बंडखोर वृत्तीची झलक पाहायला मिळते.
‘बंडखोर’ चित्रपटाची निर्मिती संजय शेट्ये यांची असून. चित्रपटाचे संवादलेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. तर महेश मांजरेकर यांनीच चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. सहा महिलांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांचे निर्णय आणि परिस्थितीविरोधातील त्यांचा लढा पडद्यावर कशा पद्धतीने मांडला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ‘बंडखोर’ 24 सप्टेंबर 2026 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
