नवी दिल्ली: September 1st layoffs: ओरेकलचे कर्मचारी गेल्या तीन आठवड्यांपासून डॅशबोर्डऐवजी कॅलेंडरवर लक्ष ठेवून आहेत. कंपनीने नोकरकपातीच्या आणखी एका टप्प्याची योजना आखली आहे. ज्या कर्मचाऱ्यांची पदे (रोल्स) रद्द केली जाऊ शकतात, त्यांची यादी मॅनेजर्सकडून मागवण्यात आली आहे. ओरेकलच्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीचा दिवस म्हणजेच 1 सप्टेंबरपर्यंत पेरोल (वेतन खर्च) कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकरणाशी संबंधित व्यक्ती आणि एका अंतर्गत कागदपत्राचा (इंटरनल डॉक्युमेंट) हवाला देत त्यांनी सांगितले की, काही टीम्समधील नोकरकपातीचा आकडा दोन अंकी टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. ओरेकलने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून सार्वजनिकरीत्या कोणतीही पुष्टी केलेली नाही.
कर्मचाऱ्यांना आता अशी भीती आहे, की 1 सप्टेंबरच्या सकाळीच ईमेल येतील. ही अपेक्षा कंपनीकडून जाहीर केलेली नसून, कर्मचाऱ्यांच्या मागील नोकरकपातीच्या अनुभवावर आधारित आहे. 31 मार्च रोजी अमेरिका, भारत, कॅनडा आणि मेक्सिकोमधील ओरेकलच्या हजारो कर्मचाऱ्यांची सकाळ 6 च्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) 'ओरेकल लीडरशिप'च्या एका संदेशाने झाली होती.
त्या संदेशाच्या सुरुवातीलाच त्यांच्या नोकरीशी संबंधित एक कठीण बातमी शेअर करण्यात आल्याचा उल्लेख होता. त्यात नमूद केले होते की, ओरेकलच्या सध्याच्या व्यावसायिक गरजांवर गांभीर्याने विचार केल्यानंतर, मोठ्या संघटनात्मक बदलाचा भाग म्हणून कंपनीने त्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे आजचा दिवस हा त्यांचा कामाचा शेवटचा दिवस (वर्किंग डे) आहे.
त्यात त्यांच्या समर्पणाबद्दल आणि कामाबद्दल आभार मानण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सांगण्यात आले की, नोकरी सोडताना मिळणारी रक्कम (Severance Pay) तेव्हाच मिळेल जेव्हा ते नोकरी समाप्तीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करतील. ही कागदपत्रे DocuSign द्वारे त्यांच्या ओरेकल ईमेल आयडीवर पाठवली जातील, ज्याचा ॲक्सेस त्यांच्याकडून लवकरच काढून घेतला जाणार होता. यासाठी एचआर (HR) कडून कोणताही कॉल आला नाही किंवा कोणत्याही मॅनेजरशी चर्चा झाली नाही. त्याच दिवशी सकाळी सिस्टीमचा ॲक्सेसही बंद करण्यात आला होता.
सध्या ओरेकलचे कर्मचारी सकाळी 6 वाजल्यापासून आपले इनबॉक्स तपासत आहेत आणि Reddit वर या तारखांबद्दल चर्चा करत आहेत.
